वास्को रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही मीटर अंतरावर मालगाडी रेल्वेला जोडलेल्या बोगीचे चाक काल रुळांवरून घसरले. सदर घटना बुधवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली.
वास्को रेल्वे स्थानकावर रेल्वेची काही कामे सुरू असून, त्यासाठी सुमारे 15 बोगी असलेली एक मालगाडी दगड आणत होती. वास्कोतील तान्या हॉटेलजवळ मालगाडी रुळावर येताच एका बोगीचे चाक निखळले. रेल्वे रुळावरून घसरल्याने कोणतीही अघटित घटना घडली नाही. या घटनेनंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी बोगीचे चाक रुळावर आणण्याचे काम सुरू केले; मात्र रात्री साडेआठ वाजेपर्यंत काम चालू होते.
दरम्यान, संध्याकाळी 7 वाजता वास्को रेल्वे स्थानकावर येणारी हावडा एक्स्प्रेस आंतरराज्य रेल्वे रात्री 9 वाजले तरी पोहोचली नव्हती. तसेच वास्को रेल्वे स्थानकातून सुटणारी यशवंतपूर रेल्वे दोन तास उशिराने सुटणार असल्याचे सांगण्यात आले. काम वेळेवर पूर्ण झाल्यास रेल्वे वेळापत्रकानुसार सोडल्या जातील, असेही सांगण्यात आले.