>> विधानसभेत केले स्पष्ट; जनहितासाठी ॲप टॅक्सीसेवेला प्राधान्य
राज्य सरकार ॲप आधारित टॅक्सीसेवेच्या प्रश्नावरून माघार घेणार नाही. लोकांच्या हितार्थ ॲप आधारित टॅक्सीसेवेला प्राधान्य दिले जाणार आहे, असे असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत वाहतूक व इतर खात्यांच्या अनुदानित पुरवणी मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना काल स्पष्ट केले.
गोवा माईल्स व्यावसायिक मॉडेलचा वापर करून 20 टक्के कमी दराने व्यवसाय करीत आहे. ॲपआधारित टॅक्सी सेवा आधुनिक तंत्रज्ञानासह पुढे घेऊन जाणार आहे. कुणावरही गोवा माईल्स किंवा गोवा टॅक्सी ॲपमध्ये सहभागी होण्याची सक्ती सरकारने केलेली नाही. स्थानिक टॅक्सीचालक वेगळा ॲप तयार करू शकतात. त्यांना आर्थिक साहाय्य करण्याची सरकारची तयारी आहे, असेही गुदिन्हो म्हणाले.
राज्यातील टॅक्सी व्यवसायात शिस्त आली पाहिजे. टॅक्सी व्यवसाय नियमित केला पाहिजे. राज्यातील काही टॅक्सी व्यावसायिक लॉबिंग करून काही आमदारांच्या माध्यमातून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही मंत्री गुदिन्हो यांनी केला.
माविन गुदिन्हो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा
>> स्थानिक टॅक्सीचालकांची म्हापशातील सभेत मुख्यमंत्र्यांकडे मागणी
स्थानिक टॅक्सीचालकांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याबद्दल वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी स्थानिक टॅक्सीचालकांनी म्हापसा येथे बोडगेश्वर मंदिराच्या प्रांगणात घेतलेल्या जाहीर सभेत काल केली. तसेच मोपा विमानतळाच्या लिंक रोडवरील टोल हटवावा, अशी मागणी त्यांनी केली. त्याशिवाय तसेच गोवा माईल्सला विरोधाची भूमिकाही त्यांनी कायम ठेवली.
माविन गुदिन्हो यांना वाहतूक खात्यांचे मंत्रिपद सांभाळता येत नाही, त्यांना मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब पदावरून हटवावे. गुदिन्हो यांना अद्याप स्थानिक टॅक्सीचालकांचे प्रश्न सोडविता आलेले नाहीत. ते टॅक्सीचालकांचे प्रश्न सोडवू शकत नसतील, तर त्यांनी 2027 ची गोवा विधानसभा निवडणूक लढवू नये, असे अखिल गोवा टॅक्सीमालक संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत म्हणाले.
टॅक्सीचालकांचे प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही, असा दावा टॅक्सीचालकांनी केला आहे. ॲपआधारित टॅक्सी सेवेमुळे स्थानिक टॅक्सीमालक आणि चालक त्यांच्या हक्काच्या व्यवसायापासून वंचित राहत असल्याचे टॅक्सीचालकांनी सांगितले.