बायडन यांची माघार

0
14

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी अगदी शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे. त्यामुळे येत्या 5 नोव्हेंबरला होणाऱ्या त्या निवडणुकीची सारी समीकरणेच पालटली आहेत. बायडन यांना कोवीड झाला होता व ते आपल्या घरीच विश्रांती घेत होते. त्यातून बरे होताक्षणी त्यांनी आपला हा निवडणुकीत पुन्हा न उतरण्याचा इरादा जाहीर करून टाकला आहे. हे करीत असताना आपला पाठिंबा विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना असल्याचेही त्यांनी जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे येत्या 19 ऑगस्टला होणार असलेल्या डेमोक्रॅटस्‌‍च्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जर कमला हॅरिस यांच्या उमेदवारीवर येणाऱ्या प्रतिनिधींनी शिक्कामोर्तब केले, तर येत्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस असा जोरदार सामना होईल. अर्थात, कमला हॅरिस यांना बायडन यांनी पाठिंबा दिलेला असला, तरी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा यांचे नावही राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवारीसाठी त्यांच्या समर्थकांकडून पुढे आलेले आहे. अर्थात, बायडन यांना प्रायमरीजमध्ये मिळालेला पाठिंबा लक्षात घेता त्या तुलनेत कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवणे सोपे जाणार आहे असे दिसते. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या 13 जुलैला प्रचारसभेमध्ये प्राणघातक हल्ला झाला तेव्हापासून ट्रम्प यांचे समर्थन वाढले होते. त्यामुळे आधीच आपल्या वार्धक्यामुळे दुबळे भासणाऱ्या बायडन यांच्या प्रतिमेवर अधिक विपरीत परिणाम झाला होता. गेल्या 27 जूनला झालेल्या प्रेझिडेन्शियल डिबेटमध्ये देखील बायडन यांचा काही प्रभाव पडू शकला नव्हता. त्यामुळे आधीच त्यांच्या फेरउमेदवारीबाबत नाराजी पसरली होती. त्यात आता त्यांनी माघार घेतली असली, तरी कमला हॅरिस यांच्या रूपाने एका कृष्णवर्णीय व दक्षिण आशियाई वंशाच्या महिलेला उमेदवारी देण्यावरून डेमोक्रॅट्समध्ये उभी फूट पडलेली दिसते. त्यामुळेच मिशेल ओबामांच्या मागे समर्थन दिले जाऊ लागले आहे. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडन यांच्यात निवडणूक होणार होती, तेव्हा बायडन हे ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक वृद्ध असल्याने तो ट्रम्प यांच्यासाठी लाभदायक मुद्दा ठरला होता, परंतु आता समीकरण बदलले आहे. 78 वर्षीय ट्रम्प यांना तुलनेने खूप कमी वयाच्या कमला हॅरिस यांचा सामना करावा तर लागेलच, शिवाय त्या एक महिला असल्याने अमेरिकेची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या त्यांच्या ध्येयाला आव्हान देणे त्यांच्यासाठी तसे सोपे राहिलेले नाही. अमेरिका हा कितीही पुढारलेला आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाता करणारा आणि महिला स्वातंत्र्याचे पाठ जगाला पढवणारा देश जरी असला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आजवर एकही महिला येऊ शकलेली नाही हे जळजळीत वास्तव आहे. त्यामुळे अमेरिकेतील कृष्णवर्णीय, दक्षिण आशियाई नागरिक आणि महिला यांचा पाठिंबा मिळवून ट्रम्प यांना मात देण्याची शिकस्त कमला हॅरिस त्यांची उमेदवारी निश्चित झाली तर करतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीत पुन्हा उतरण्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आधीच अत्यंत विद्वेषपूर्ण बनलेली आहे. बायडन यांनी निवडणुकीतून माघार घेताक्षणी ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील सर्वांत वाईट राष्ट्राध्यक्ष अशा शेलक्या शब्दांत बायडन यांची संभावना केली. निवडणुकीच्या प्रचारामध्ये एक सभ्यता अपेक्षित असते. परंतु ट्रम्प यांचे एकूण वर्तन हे अत्यंत आक्रमक आणि सभ्यतेच्या सीमा उल्लंघणारे असते हे अनेकदा दिसून आलेले आहे. कमला हॅरिस यांच्या रूपाने एक महिला जेव्हा त्यांना आव्हान देण्यासाठी उभी राहील तेव्हा ट्रम्प यांना आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवावे लागेल. कमला हॅरिस यांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणे ही बाब भारतासाठीही अभिमानास्पद म्हणता येईल, कारण त्या मूळ भारतीय वंशाच्या आहेत आणि त्यांनीत याचा अभिमानही बाळगला आहे. त्यांची आई श्यामला गोपालन हॅरिस यांनी सिंगल मदर म्हणून आपल्या कमला व माया या दोन्ही मुलींना वाढवले. श्यामला यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या ह्या कन्या भारतात आल्या होत्या व हिंदू पद्धतीने सर्व विधी केले होते. चेन्नईशी असलेली आपली नाळ कमला यांनी कायम राखली आहे. कमला यांचे आजोबा पी. व्ही. गोपालन हेे झांबियाच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार झाल्याने आफ्रिकेत गेले. त्यामुळे आफ्रिकेशीही ह्या घराण्याचे नाते जुळले. त्यामुळे त्या जेव्हा अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष झाल्या, तेव्हा भारत व आफ्रिकेतही हर्ष व्यक्त झाला होता. ब्रिटनच्या पंतप्रधानपदावरून ऋषी सुनक नुकतेच पायउतार झाले. आता कमला हॅरिस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची पायरी चढत आहेत ही त्यामुळे लक्षवेधी बाब आहे.