पणजीतील पाऊस ः तेव्हाचा आणि आताचा

0
37

शरत्चंद्र देशप्रभू

पणजीचे आता पूर्णपणे काँक्रीटीकरण झाले आहे. चौकीची घरे, वाडे जाऊन इमारती आल्या. त्या जमीनदोस्त होऊन टोलेजंग टॉवर येत आहेत. आता परिस्थिती तशी उरलेली नाही. रस्त्यावरच्या पाण्यात काय असेल सांगता येत नाही. डिझेल, पेट्रोलचे तवंग दिसतातच. शिवाय प्लास्टिक, काचेचे तुकडे अन्‌‍ खिळे. कधीकधी सांडपाण्याचाही पूर्ण सहभाग असतो. अशा वातावरणात पूर्वी पाहिलेल्या पावसाच्या दिमाखाचा अंश आता दिसणार नाही.

पेडण्याहून पणजीत आगमन झाल्यावर इथल्या पहिल्या पावसाचे दर्शन झाले. 1953 साल असावे. कुणी म्हणेल, इथला-तिथला असा वेगवेगळा पाऊस असूच शकत नाही! परंतु भौगोलिक स्थान, कालांतराने झालेले बदल पावसाचे रूप ठरवते, आकार देते.

पेडण्यातील विविधरूपी पाऊस मनावर कोरलेला. छताची वार्षिक दुरुस्ती केली, शाकारणी केली तरी गावठी किंवा मंगळुरी कौलांच्या फटीतून टपटपणारे थेंब कधी थेट चेहऱ्यावर, तर कधी पोटावर गाढ झोपेत किंवा साखरझोपेत असताना! अंथरुणाची जागा बदलली तरी थेंब टपकणारच. कधीकधी धारसुद्धा लागायची. मग शाकारणाऱ्यावर अन्‌‍ पावसावर राग. अंथरूण सुरक्षित ठेवले तरी गळणाऱ्या पाण्यासाठी ठेवलेल्या भांड्यातील शिंतोडे अन्‌‍ लयबद्ध नाद झोपेची लय बिघडवणारे.
पणजीत रेडकरांच्या बिऱ्हाडी ‘थेंबे थेंबे तळे साचे’चा त्रास नव्हता. राहायची जागा आल्तिनो टेकडीच्या पायथ्याशी असल्याने पावसाचे रौद्र रूप दिसायचे. टेकडीवरून वाहणारे अक्राळविक्राळ लाल पाण्याचे लोंढे दरीत कोसळताना घराच्या मागच्या अंगणातून दिसत. धबधब्यासारखा आवाज, रोरावत जाणारे पाण्याचे लोट पाहून भान हरपत असे. चाळीच्या समोरचा भाग सिमेंटने आच्छादलेला. येथे पावसाचे पाणी साचे. या तुंबलेल्या पाण्यात आमच्या कागदी होड्या डौलाने डोलत. ‘कामरा’च्या कर्मचाऱ्यांनी पाणी तुंबलेल्या जागा साफ केल्यावर वाहत्या पाण्यात आमच्या या होड्या गडप!

पेडण्यात माझा शाळाप्रवेश झाला नव्हता. इथेच मुष्टिफंड शाळेत प्रथम प्रवेश. ही शाळा पाच मिनिटांच्या अंतरावर. पहिल्या प्रवेशाचे मनावर दडपण. बाहेर पावसाचे टपोरे थेंब, तर अनामिक भीतीने माझ्या डोळ्यांतून टपटपणारे अश्रू! नव्या कपड्यांची नवलाई मनावरच्या दडपणामुळे विरून जायची. परंतु नवीन ‘कापेती’चा प्लास्टिकचा गंध मात्र आवडल्याचे स्मरते. मुकाट्याने शाळेत गेलो नाही तर गड्याच्या खांद्यावरून मिरवणूक. यामुळे मन ओशाळे ओशाळे होत असे.
पावसाला सुरुवात झाल्यावर बेडकांचे डरांव-डरांव सुरू व्हायचे. त्याकाळी पणजी वनश्रीने नटलेली. पाणथळ भागात भल्या मोठ्या पिवळ्या-काळसर रंगाच्या बेडकांचे भेसूर दर्शन व्हायचे. त्याकाळी रस्ते कधी पाण्याखाली गेले नाहीत. गोट्यांचा खेळ ओल्या रस्त्यावर खेळताना मातीने, चिखलाने हात बरबटायचे. दुकानात गोट्या काचेच्या बरण्यात विक्रीसाठी ठेवल्या जात. गोट्या खेळण्याचे विविध प्रकार. नवीन चकचकीत रंगीबेरंगी गोट्या मातीत टाकण्यापूर्वी जिवाची घालमेल होत असे. मातीशी घर्षण झाल्यावर गोट्यांचा रंग अन्‌‍ चकाकी टिकत नसे. परंतु खडबडीत गोटी हातातून सटकत नसते. पावसापूर्वी अन्‌‍ नंतर पाकोळ्यांचा फार त्रास होत असे. दिव्याभोवती फेर धरणाऱ्या या पाकोळ्यांचा दिवाबत्ती बंद करूनच बंदोबस्त करावा लागे. पणजीत त्यावेळी वृक्षांच्या फांदीवर अंगावरचे पावसाचे पाणी निपटण्यात मग्न असलेल्या पोपटांचे पण दुर्मीळ दर्शन घडत असे.

पणजीतत्याकाळी लाकडी दांड्याच्या दणकट छत्र्या वापरल्या जात. तुफानवाऱ्यात पण त्या उलट्या होण्याची शक्यता कमी. वयोवृद्ध माणसे घरीच राहणे पसंत करीत. झरे, विहिरी भरून तुडुंब. बोक-द-व्हाक येथील ‘झरी’चा डामडौल पावसात अनोखाच! कोसळणाऱ्या अन्‌‍ वाहणाऱ्या पाण्याचा प्रपात डोळ्यांचे पारणे फेडणारा.
1962 साली पणजीत पुनरागमन केल्यावर मध्यवर्ती भागात एका दुमजली घरात वास्तव्य. पावसाळ्यात छतावरच्या भव्य परंतु ओल्या ‘पाट्यां’ची भीती वाटायची. हे छत भर पावसात कोसळेल ही मनात आशंका. शिवाय मातीच्या भिंती पण पाण्याने फुगायच्या. आता तर या घराचा अर्धा भाग कोसळलाय. मालक अन्‌‍ भाडेकरू यांच्यातला वाद मिटायची चिन्हे दिसत नाहीत. समेटात मालकाने समन्वय, चर्चा याला प्राधान्य द्यावेच लागेल. लवचिकता हा व्यावसायिक दृष्टिकोनाचा स्थायिभाव.
‘इन्स्टिट्यूट ऑफ इन्स्ट्रक्शन’ अन्‌‍ ‘डॉन बॉस्को’ या घराच्या डाव्या अन्‌‍ उजव्या दिशेने असणाऱ्या संस्थांत आमचे शिक्षण झाले. डॉन बॉस्कोच्या भव्य मैदानावर पावसाची मजा लुटण्याचा आनंद अवर्णनीयच. याच घरात पावसाळ्यात मिरामारच्या समुद्राची घनगंभीर, हवीहवीशी वाटणारी गाज ऐकण्याची संधी कित्येक वर्षे अनुभवली. मांडवी नदीचा लालभडक पाण्याचा फेसाळत, दोन्ही तटांना चाटून जाणारा प्रवाह पाहून मन प्रसन्न व्हायचे. काठावर गळ टाकून असणारे ध्यानमग्न हौशी मासेमार. हे चित्र आता दिसणे दुरापास्त. कधीकधी तर पाण्याची पातळी वाढली की रस्त्यावरच्या पादचाऱ्यांना पण पाण्याचे जोरदार फटकारे सहन करावे लागत. परंतु नाराजीचा सूर नव्हता.

मिरामारला धेंपो कॉलेजमध्ये असताना मध्यंतराच्या सुट्टीत किनाऱ्यावर जाणे व्हायचे. धुआंधार वातावरणात कधी पावसाच्या अचानक आलेल्या जोरदार सरीने कपडे भिजून जायचे. ते अंगावर सुकेपर्यंत क्लास चुकणार!
त्याकाळी पावसाच्या लालभडक पाण्यातून फिरून घरी आल्यावर हातपाय धुणे साहजिकच. परंतु या रस्त्यावरच्या पावसाच्या पाण्याचा स्पर्श झाला म्हणून ओंगळवाणे वाटत नव्हते. मातीमिश्रित पाणी मुलाबाळांच्या नाकातोंडात पण जात असे. भीती वाटायची ती सर्दी होईल याची. आता परिस्थिती तशी उरलेली नाही. रस्त्यावरच्या पाण्यात काय असेल सांगता येत नाही. डिझेल, पेट्रोलचे तवंग दिसतातच. शिवाय प्लास्टिक, काचेचे तुकडे अन्‌‍ खिळे. कधीकधी सांडपाण्याचाही पूर्ण सहभाग पण असतो. पावसाळ्यात मिरामारच्या किनाऱ्यावर जायचे कोणी धाडस करणार नाही. परंतु पावसाची रिपरिप कमी झाली अन्‌‍ असे धाडस केले तर तुम्हाला डांबरी गोळ्यांचा त्रास होईल. शिवाय पिवळेजर्द असलेले घाण सांडपाणी. रोगराईला त्वरित आमंत्रण. कुणाच्या मते हे पाणी सार्वजनिक बांधकामाच्या सेवेरेज प्लांटमधून येते, तर कुणाच्या मते हे मांडवीत तरंगत असलेल्या कॅसिनोमुळे होते. परंतु याचे दर्शन ओंगळवाणे वाटते. शिवाय रोगराईची भीती अलगच. गोव्याच्या बहुतेक प्रगत भागात सांडपाणी प्रक्रिया करण्याची पद्धत नसल्यामुळे सांतिनेज मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पावर अतिरिक्त भार येणे साहजिकच. परंतु पणजी अन्‌‍ सभोवतालच्या परिसरावर होणाऱ्या दुष्परिणामाला कोण जबाबदार? सत्य बाहेर आले तर शंका-आशंकांना वाव राहणार नाही. पणजीत अजून तरी पावसाचे पाणी जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी शुद्ध असेल अशी आपण अपेक्षा करू शकतो. देशातील इतर अतिप्रगत शहरांत तर रासायनिक पाऊस अनुभवल्याची उदाहरणे आहेत. पणजीचे आता पूर्णपणे काँक्रीटीकरण झाले आहे. चौकीची घरे, वाडे जाऊन इमारती आल्या. त्या जमीनदोस्त होऊन टोलेजंग टॉवर येत आहेत. अशा वातावरणात पूर्वी पाहिलेल्या पावसाच्या दिमाखाचा अंश पण दिसणार नाही. विस्कळीत जनजीवनाचे पावसाळ्यात प्रसंग यायचे, परंतु मानवाच्या आवाक्यात, परिघात. रस्त्यावर पूरग्रस्त परिस्थिती क्वचितच दिसायची. पणजीत पावसाळ्यात मच्छरचा त्रास प्रकर्षाने जाणवायचा. मलेरियाचे रुग्ण पण असतील. एखादा फायलेरियाचा रुग्ण पण हुडकून सापडला असेल. परंतु आता पावसाळ्यात अतिरेक्यांपेक्षा मच्छरची भीती वाटते. रोगनिदान होईपर्यंत तुम्हाला कुठल्या प्रकारचा मलेरिया झाला आहे, टायफॉईड की डेंग्यू याचा थांगपत्ता लागत नाही. दिवसा पण घोंघावणारे डास पणजीवासीयांचे यमदूत ठरू शक तात. यासाठी मुबलक पाण्याचे चोचले पुरवण्यासाठी पणजीकरांना पाऊस हवा, परंतु मौजमजा, फिरण्या-हिंडण्यावर निर्बंध घालणारा पाऊस नको. विविध प्रकारचे जीवघेणे रोग पसरवणारा आताचा पणजीचा पाऊस उंच इमारतीच्या तोऱ्यापुढे हीनदीन झालेला कुणाला हवा?