.. परदेसी हो गये!

0
20

गेल्या दहा वर्षांत तब्बल 26 हजार गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्व सोडल्याची माहिती नुकतीच गोवा विधानसभेत देण्यात आली आहे. हा आकडा जरी मोठा असला, तरी तो धक्कादायक म्हणता येणार नाही, कारण गोव्यातील पोर्तुगालच्या वाणिज्य दूतावासाबाहेर त्यांचा पासपोर्ट मिळवण्यासाठी नित्य लागणाऱ्या गोमंतकीयांच्या रांगा लक्षात घेतल्या, तर हे जे काही स्थलांतर आजवर सतत चालत आलेले आहे त्याच्या व्याप्तीचा अंदाज येतच होता. अर्थात, भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून पोर्तुगालचा पासपोर्ट घेण्याची ही जी काही धडपड चालली आहे, ती काही पोर्तुगालवरच्या निष्ठेपोटी किंवा पोर्तुगालच्या प्रेमापोटी नव्हे. पोर्तुगालचा पासपोर्ट मिळवल्यास युरोपमध्ये स्थलांतर करणे सोपे होत असल्यामुळेच केवळ ह्या रांगा लागत राहिल्या आहेत. ह्या स्थलांतरितांमध्ये मुख्यत्वे गोमंतकीय ख्रिस्ती तरुण तरुणी अधिक आहेत असेही दिसेल. याचे कारण ख्रिस्ती धर्मीय तरुणांमधील उच्च शिक्षणाचा असलेला अभाव व त्याचा परिणाम म्हणून विदेशांमध्ये किरकोळ नोकऱ्या पत्करण्याची निर्माण झालेली परंपरा हेच आहे. अर्थात, यावर काही शास्त्रोक्त अभ्यास झालेला नाही, परंतु गोवा मुक्तीनंतर एकूण गोमंतकीय ख्रिस्ती तरुणांची पसंती असलेल्या नोकऱ्या पाहिल्या तर बोटीवर खलाशी म्हणून जाणे किंवा परदेशात स्वयंपाक्याची किंवा तत्सम नोकरी पत्करून आपल्या मायदेशी पैसा पाठवणे हेच ध्येय अनेकांनी समोर ठेवल्याचे आणि त्यासाठी स्थलांतर केल्याचे दिसते. राज्य विधानसभेत काही वर्षांपूर्वी हा विषय चर्चिला गेला होता व एका माजी मुख्यमंत्र्यांनी त्यावर केलेली परखड टिप्पणी वादग्रस्तही ठरली होती. परंतु कोणी काहीही म्हटले तरी ते वास्तव आहे. पोर्तुगीज नागरिकत्व पत्करण्यासाठी लागणाऱ्या रांगा ह्या मुख्यत्वे रोजगारासाठी आहेत. दुहेरी नागरिकत्वास भारत सरकारची संमती नसल्याने भारतीय नागरिकत्वाचा त्याग करूनच पोर्तुगालची वाट चालणे ह्या गोमंतकीय तरुणांना भाग पडताना दिसते. दुहेरी नागरिकत्वाची मागणी पुढे आली आहे ती ह्याच स्थलांतराच्या रेट्यामुळे. हे जे तरूण विदेशांत जात आहेत, त्यांना गोव्याविषयी प्रेम नाही असे बिल्कूल नाही. जगात कुठेही गेले तरी गोमंतकीयत्व मिरवण्यात ते धन्यता मानतात, परंतु रोजगाराच्या संधींसाठी विदेशांत धाव घेणे आणि सुखवस्तू जीवन जगणे हे त्यांचे उद्दिष्ट बनले आहे. एकदा का विदेशी जीवनाची चटक लागली की गोव्यात नियमित परतणे होत नसल्याने ह्या स्थलांतरितांच्या जमिनी बनावट कागदपत्रांद्वारे हडप करणाऱ्या टोळ्या गोव्यात कशा निर्माण झाल्या आणि त्यांनी अक्षरशः लाखो चौरस मीटर जमिनी कशा हातोहात हडप केल्या हे भूघोटाळ्यात समोर आलेच आहे.
विधानसभेत मांडली गेलेली आकडेवारी पाहिली तर असे दिसेल की दरवर्षी जवळजवळ तीन ते चार हजार गोमंतकीय आपले भारतीय नागरिकत्व त्यागून पोर्तुगीज नागरिक बनण्यात धन्यता मानत आले आहेत. मात्र, 2020 नंतर त्यामध्ये मोठी घट झाली असल्याचेही ही आकडेवारी सांगते. ह्याचा अर्थ सरळ आहे. ब्रिटनने युरोपीय महासंघातून ‘ब्रेक्झिट’ द्वारे जी एक्झिट घेतली, त्यामुळे हे प्रमाण खाली आले आहे. शिवाय 2020 व 2021 हा सगळा कोरोनाकाळ होता. जे गोमंतकीय विदेशांत ठिकठिकाणी होते, त्यांना ह्या संकटाच्या प्रसंगी मात्र आपल्या मायभूमीची आठवण आली होती आणि गोवा सरकारला ते आपल्याला मायदेशी न्या हो म्हणून गळ घालत होते. आजवर प्रथा अशी पडली होती की पोर्तुगालचा पासपोर्ट आणि नागरिकत्व मिळवायचे. त्याच्या आधारे मुख्यत्वे ब्रिटनमध्ये घुसायचे. तेथे नोकरी पत्करायची आणि सुखवस्तू जीवन जगायचे. ह्या स्थलांतरितांपैकी खुद्द ब्रिटनमध्ये असलेल्या गोमंतकीयांची संख्या फार मोठी आहे. जगात असा एकही देश नसेल की जेथे भारतीय नसतील हे मोदींच्या विदेश दौऱ्यांतून प्रत्ययाला येत असते. कोरोनाकाळातही ते दिसून आले. ह्या विदेशस्थ भारतीयांमध्ये गोमंतकीयांचे प्रमाणही मोठे आहे. एक काळ होता, जेव्हा केवळ आखाती देश म्हणजे गोमंतकीय अल्पशिक्षित तरुणांची पंढरी बनलेली होती. परंतु नंतर युरोप त्यांना खुणावू लागला. आता अन्य प्रगत देशांमध्येही ते सर्वत्र वावरताना दिसतात. दुहेरी नागरिकत्वाची सोय नसल्याने ही सगळी गोमंतकीय तरुण मंडळी आपली गोव्याशी असलेली नाळ तोडून टाकत आहेत ही मात्र दुःखदायक बाब आहे. गोव्यातील एकंदर राजकीय वातावरणाविषयी निर्माण झालेली घृणा हेही त्यामागचे एक कारण असू शकते. गोव्याविषयी आत्यंतिक ममत्व आणि प्रेम असूनही ह्या मंडळींना नागरिकत्वाचा त्याग करण्याचा पर्याय निवडावा लागत आहे. त्यामुळे सरकारने ह्यासंदर्भात काही ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.