हकनाक बळी

0
14

काश्मीरमध्ये एका मेजरसह चार सैनिकांचा काल दहशतवाद्यांच्या निर्घृण हल्ल्यात पुन्हा बळी गेला. गेले दोन महिने जम्मू काश्मीरमध्ये नुसता रक्तपात चालला आहे. मागच्या बत्तीस महिन्यांत आपल्या 48 सैनिकांचा दहशतवादी हल्ल्यांत बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. कोणतीही युद्धपरिस्थिती नसताना शांततेच्या काळात दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत आपल्या लष्करी अधिकाऱ्यांचा आणि जवानांची अशी हकनाक आहुती जाणे हे अतिशय दुःखदायक आहे. जम्मू काश्मीरमध्ये आपल्या सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादावर जो वचक बसवला होता, तो आता उरलेला नसल्याचेच हे द्योतक आहे. हे कशामुळे झाले ह्याची कारणे तातडीने शोधून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. सातत्याने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे गेल्या महिन्यात पंतप्रधानांनी परिस्थितीचा आढावा घेऊन त्या राज्यातील सुरक्षा दलांनी आपल्या दहशतवादविरोधी उपाययोजनांचा पूर्ण क्षमतेने वापर करा असे आदेश दिले होते. परंतु तरी देखील सातत्याने हे हल्ले सुरू आहेत. खुद्द काश्मीर खोऱ्याऐवजी पीर पंजाल पर्वतराजीच्या दक्षिणेत जम्मूच्या डोंगराळ व घनदाट अरण्याच्या भागाचा फायदा उठवत हा हिंसाचार माजवला जात असल्याचे आतापर्यंतच्या सततच्या हल्ल्यांनी स्पष्ट झालेलेच आहे. घुसखोरीसाठी देखील नवे मार्ग तयार केले गेलेले आहेत. परंतु ह्या सर्वांवर नियंत्रण आणण्यात आपल्या सुरक्षा यंत्रणांना अजूनही यश आलेले दिसत नाही. जम्मू काश्मीरमधील दहशतवादासंदर्भात दोन – तीन नवीन गोष्टी समोर आलेल्या आहेत, त्यांची दखल घेणे जरूरी आहे. पहिली बाब म्हणजे आजकाल दहशतवादी हल्ल्यांमध्ये आपले जवान मृत्युमुखी पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे दहशतवाद्यांकडे आलेल्या पोलादी गोळ्या हे आहे. ह्या चिलखतभेदी पोलादी टोके असलेल्या गोळ्यांचा वर्षाव हे दहशतवादी करतात, त्यामुळे लष्कराच्या चिलखती वाहनांमधून प्रवास करणारे आपले जवान प्रत्युत्तराची संधी न मिळता बळी जात आहेत. कालच्या घटनेमध्ये देखील तब्बल पाचशे किलोमीटरवरून लष्कराच्या वाहनांवर हा दहशतवादी हल्ला झाला. एम 4 प्रकारच्या अत्याधुनिक रायफलींतून सुसाटत आलेल्या पोलादी टोकाच्या गोळ्यांनी लष्कराच्या चिलखती वाहनांचा भेद करीत आतील अधिकारी व जवानांचा बळी घेतला. ह्या नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपल्या चिलखती वाहनांना अधिक मजबुती देण्यासाठी तातडीने पावले उचलली जाण्याची गरज आहे. जम्मू काश्मीरमध्ये चिलखती गाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. त्याच्याच बळावर तेथे कायदा व सुव्यवस्था राखणे शक्य होते. परंतु आता ह्या चिलखती गाड्याच जर असुरक्षित बनलेल्या असतील, तर जवानांचे मनोबल खच्ची होण्याची भीती आहे. त्यामुळे त्यासंदर्भात तातडीने लक्ष देणे जरूरी असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट समोर आलेली आहे ती म्हणजे ह्या दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी घेण्यासाठी ‘काश्मीर टायगर्स’ नावाचा एक नवा गट समोर आलेला आहे. अर्थात, पाकिस्तानस्थित जैश ए महंमदचेच हे अपत्य असले, तरी जणू काही हे स्थानिक काश्मिरी दहशतवादी आहेत असा आभास ह्या नव्या नावातून निर्माण केला गेला आहे. ह्या दहशतवाद्यांना शस्त्रे, पैसा कुठून मिळतो त्याचा बंदोबस्त करण्यासाठी नव्याने पावले उचलावी लागतील. राष्ट्रीय तपास संस्थेने हुर्रियतपासून हिज्बूलपर्यंत सर्वांच्या मानगुटा पकडल्याने काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद कमी झाला होता, परंतु आता परिस्थिती पुन्हा बिघडलेली आहे. नुकत्याच खोऱ्यात दहशतवाद्यांच्या नाकावर टिच्चून लोकसभा निवडणुका पार पडल्यामुळे आणि लवकरच केंद्र सरकार काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याचीही तयारी करीत असल्याने दहशतवादी शक्ती चवताळल्या आहेत, त्यामुळेच बेभान होऊन पाठोपाठ हे हल्ले चढवत आहेत. लष्करालाच नव्हे, तर आम नागरिकांना देखील लक्ष्य केले जाते आहे. रियासीमधील यात्रेकरूंवरील हल्ला असो किंवा पहलगाममधील पर्यटक दांपत्यावरील हल्ला असो, वाट्टेल ते करून काश्मीरमध्ये आपला वरचष्मा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात दहशतवादी शक्ती आणि त्यांचे पाकिस्तानस्थित पाठीराखे आहेत. दहशतवादाचा निःपात मुळावर घाव घातल्याशिवाय शक्यच नाही हे तर स्पष्टच आहे. हे सोपे नाही, परंतु निश्चितच असंभवही नाही. काट्याचा नायटा होण्याआधी काट्याने काटा काढणे अधिक गरजेचे असते, अन्यथा जखम चिघळते आणि मलमपट्टीच्या पलीकडे जाते. काश्मीरमधील लष्करी अधिकाऱ्यांचे दिवसागणिक हकनाक जाणारे बलिदान निमूटपणे पाहणे देशाला परवडणारे नाही. नव्याने सत्तारूढ झालेले मोदी सरकार दहशतवादापुढे हतबल दिसता कामा नये.