सनबर्न महोत्सव खासगी, त्याला विरोध का? : मुख्यमंत्री

0
5

सनबर्न हा एक खासगी संगीत महोत्सव आहे. अशा खासगी संगीत महोत्सवाला लोक का विरोध करतात तेच मला कळत नाही, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना सनबर्न महोत्सवासंबधी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले. काल मुख्यमंत्र्यांनी पणजीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेच्या वेळी पत्रकारांनी त्यांना वादग्रस्त सनबर्न संगीत महोत्सवाविषयी छेडले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

सनबर्न आयोजकांनी आपला संगीत महोत्सव दक्षिण गोव्यात आयोजित करण्यासाठी परवानगी मागितली असेल असे स्पष्ट करून त्यासंबंधी सरकार योग्य काय तो निर्णय घेईल. आयोजकांना दरवर्षी तशी उशिराच परवानगी मिळत असते, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काही लोक सनबर्न फेस्टिव्हलला का विरोध करीत आहेत तेच आपणाला कळत नसल्याचे ते म्हणाले.

एफआयआर दाखल करा : युरी

दरम्यान, यंदा सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल हे दक्षिण गोव्यात होणार आहे अशी जाहिरात प्रसिद्ध करून या महोत्सवासाठीच्या तिकिटांची विक्रीही सुरू केलेल्या सनबर्न महोत्सवाच्या आयोजकांवर गोवा सरकारने एफआयआर दाखल करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. दक्षिण गोव्यात सनबर्न महोत्सवाचे आयोजन करण्यासाठीची परवानगी न घेताच त्यानी या महोत्सवाची जाहिरातबाजी चालवली असून महोत्सवासाठीच्या तिकिटांचीही विक्री सुरू करून एका प्रकारे गोवा सरकार व गोमंतकीयांना गृहित धरून हे सगळे चालवले आहे, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे. दक्षिण गोव्यात कुठेही हा वादग्रस्त संगीत महोत्सव आयोजित करण्यास काँग्रेस पक्षाचा विरोध आहे, असे अमित पाटकर यांनी आपल्या ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे. सनबर्नच्या आयोजकांनी जाहिरातीद्वारे यंदा दक्षिण गोव्यात 28 ते 30 डिसेंबर या दरम्यान होणार आहे.