- साची रणजीत बांदोडकर
(श्री महालसा नारायणी हायस्कूल)
केव्हा एकदा मार्च महिन्याची अंतिम परीक्षा संपते आणि उन्हाळी सुट्टी सुरू होते असे मला झाले होते. म्हणता म्हणता अंतिम परीक्षेचा शेवटचा दिवस उजाडला. त्या दिवशी मी गणिताचा पेपर देऊन घरी आले. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो.
काही दिवसांवर माझा वाढदिवस होता. त्या दिवशी संध्याकाळी माझे मित्र-मैत्रिणी आणि काही नातेवाईक आले होते. केक कापून आम्ही आईने केलेले स्वादिष्ट जेवण जेवलो. आम्हाला म्हणजे मला आणि माझ्या बहिणीला शाळेमध्ये शिगमोत्सवच्या सरावासाठी बोलाविण्यात आले होते. सुट्टीत आम्ही काही दिवस शाळेत सरावासाठी गेलो. आता पाऊस थोडीफार आपली चाहूल दाखवत होता. परीक्षेच्या निकालाचा दिवस जवळ येत चालला होता. त्या दिवशी आम्ही सगळे शाळेमध्ये गेलो आणि निकालपत्र घेतले. आम्हा दोघींना चांगले गुण मिळाल्याच्या आनंदात माझ्या बाबांनी धर्मस्थळाला जाण्याचा निर्णय घेतला. आमची सगळी तयारी झाली. त्या दिवशी आम्ही पहाटे उठलो आणि रेल्वे स्टेशनला पोहोचलो. आमची ट्रेन 7 वाजता येणार होती, पण अचानक बाबांना कळलं की ट्रेन आता 9 वाजता येणार आहे. आम्ही खूप निराश झालो.
बरोबर 9 वाजता ट्रेन आली आणि आम्ही उडुपी येथे पोहोचलो. तेथे असलेल्या श्रीकृष्ण मंदिराचे आम्ही दर्शन घेतले. महाप्रसादाचाही आस्वाद घेतला. धर्मस्थळ येथे रात्री पोचलो. तिथे खोली घेऊन रात्री मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मंजुनाथ देवाचे दर्शन घेतले आणि सुब्रह्मण्यमसाठी निघालो. सुब्रह्मण्यमला नागदेवताचे दर्शन घेतले आाणि थोडीफार खरेदीही केली. त्या रात्री आम्ही तिथे थांबलो आणि सकाळी नाश्ता करून रेल्वेने अंकोला येथे पोहोचलो. तिथे देवाचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या अंतिम मंदिराकडे गेलो. गोकर्ण दर्शन घेऊन आम्ही महाप्रसाद घेतला आणि घरी येण्यासाठी पुन्हा रेल्वे पकडली.
ही धर्मस्थळाची यात्रा झाल्यानंतर शाळेला फक्त 10-15 दिवस बाकी होते. आम्ही उन्हाळ्यातील दिवसांमध्ये खूप आंबे, चिकू आणि फणस खाल्ले. आम्हाला पुस्तकांची यादी आमच्या शिक्षकांकडून मिळाली होती. आम्ही लगेच पुस्तके आणि काही सामान आणायला गेलो. या सगळ्या गोष्टींमुळे उन्हाळ्याची सुट्टी कधी संपली तेच कळले नाही. तसेच आम्हाला शाळेतील मित्र-मैत्रिणींना भेटण्याची तेवढीच ओढ लागून राहिली होती. या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही खूप काही शिकलो.