>> संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी; के. पी. शर्मा ओली यांच्या पक्षाने काढला पाठिंबा
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांना काल मोठा धक्का बसला. कारण ते संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात अपयशी ठरले. 19 महिने पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर आता त्यांना देशाचे पंतप्रधानपद सोडावे लागणार आहे. माजी पंतप्रधान के. पी. शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सीएपीएन-यूएमएल पक्षाने प्रचंड यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी नेपाळच्या संसदेत बहुमत चाचणी घेण्यात आली, त्यामध्ये पुष्प कमल दहल प्रचंड यांचे सरकार पराभूत झाले.
पुष्प कमल दहल यांनी 25 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी पाच वेळा अविश्वास ठरावाचा सामना केला आहे. यापूर्वी त्यांच्या विरोधकांनी चार वेळा विश्वासदर्शक ठराव मांडला होता. मात्र चारही वेळा ‘प्रचंड’ हे विश्वासदर्शक ठराव जिंकले होते. 69 वर्षीय प्रचंड यांना 275 सदस्यीय प्रतिनिधी सभेत केवळ 63 मते. अविश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 194 मते पडली. विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी किमान 138 मते मिळवणे आवश्यक
होते.
नेपाळच्या कनिष्ठ सभागृहातील सर्वात मोठा पक्ष नेपाळी काँग्रेसबरोबर वाटाघाटी केल्यानंतर के. पी. शर्मा ओली यांच्या पक्षाने म्हणजेच सीएपीएन-यूएमएलने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सीएपीएन-यूएमएलने प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळशी युती तोडली आहे. त्यामुळे प्रचंड यांचे सरकार आता कोसळले आहे. प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळकड केवळ 32 सदस्य आहेत. सीएपीएन-यूएमएलकडे 78 व नेपाळी काँग्रेसकडे 89 सदस्य आहेत. त्यामुळे आता देशात नेपाळी काँग्रेस व सीएपीएन-यूएमएल हे दोन पक्ष मिळून सत्तास्थापन करतील. या दोन पक्षांकडे मिळून 167 सदस्यांची
ताकद आहे.