19 डिसेंबरपर्यंत गोवा 100 टक्के साक्षर करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री

0
13

गोवा सरकार येत्या 19 डिसेंबर 2024 रोजी गोवा राज्य हे 100 टक्के साक्षर घोषित करू पहात असून हे उद्दिष्ट गाठता यावे यासाठी राज्यातील जे दोन टक्के लोक निरक्षर आहेत त्यांना साक्षर बनवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील केपे, सांगे व काणकोण हे तीन तालुके सोडल्यास अन्य तालुक्यांतील निरक्षर लोकांचा शोध घेऊन त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण हे 98 टक्के एवढे असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते काल समग्र शिक्षा अभियानसाठी विद्यार्थ्यांकरिता ‘किलबिल’ या पाठ्यपुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर व शिक्षण संचालक शैलेश झिंगडे उपस्थित होते.

आतापर्यंत राज्यातील सुमारे 3 हजार निरक्षर वरिष्ठ नागरिकांना साक्षरतेसाठीचे शिक्षण देण्यात आलेले असून त्यापैकी 700 जणांनी यशस्वीपणे परीक्षा दिली असल्याची मााहितीही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिली. उर्वरित 2700 जण हे 14 जुलै रोजी वेगवेगळ्या केंद्रांतून त्यासाठीची परीक्षा देणार असल्याचे ते म्हणाले.
केपे, काणकोण व सांगे ह्या उर्वरित तीन तालुक्यांतील निरक्षर लोकांचा शोध घेण्याचे काम हे 2 ऑक्टोबरपर्यंत हाती घेण्यात येणार असून त्यांना साक्षरतेसाठीचे शिक्षण देऊन 30 नोव्हेंबरपर्यंत त्यासाठीची परीक्षा देण्यास सांगितले जाणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

पुढील पाच महिन्यांत साक्षरतेचे प्रमाण शंभर टक्के करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल सुरू आहे. हे 100 टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट येत्या गोवा मुक्तिदिनापर्यंत पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायतींनी आपापल्या क्षेत्रातील निरक्षरांची यादी शिक्षण खात्याला सादर करावी. त्यानंतर या लोकांना साक्षर करण्याची मोहीम राबवली जाईल अशी माहिती पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिली.

सांगे, केपे व काणकोण येथील ग्रामपंचायतींना याबाबत निर्देश दिलेले आहेत. निरक्षरांची यादी मिळाल्यानंतर पुढील पाच महिन्यांत त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनाही कोकणी, मराठी किंवा त्यांना हवी ती भाषा लिहायला, वाचायला शिकवून साक्षर केले जाईल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी, ज्या युवकांना या मोहिमेचा भाग व्हायचे असेल त्यांनी खात्याशी संपर्क साधावा. त्यांना मानधन दिले जाईल, अशी माहिती दिली.