कन्हैय्यालाल याचा खून केल्याचा संशय

0
12

>> लोटली येथे सापडला होता मृतावस्थेत

कोलवा व आसगाव येथील पोलिसांची प्रकरणे गाजत असताना लोटली येथे वेर्णा औद्योगिक वसाहतीजवळ कन्हैयालाल मोंडल (32) याचा अपघाती मृत्यू नोंद करून मायणा – कुडतरी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंद केला होता. आता फोंडा पोलिसही मृत्यू प्रकरणी गुंतले असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. दरम्यान, कन्हैय्यालाल याचा खून केल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्या दिशेने तपास सुरू आहे.

दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी मायणा – कुडतरी पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मायणा – कुडतरी पोलिसांनी अपघाताशी संबंधित लॉरी ताब्यात घेतली आहे. मात्र, त्या लॉरीचा चालक पोलिसांना सापडलेला नाही. मयत कन्हैयालाल याच्या मानेवर तीन, पोटावर दोन व हातावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे आढळून आले आहे. या संबंधीचा वैद्यकीय अहवाल जिल्हा इस्पितळाकडून मायणा कुडतरी पोलिसाना मिळाला आहे.

यामुळे तो अपघात नसून खून असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अंगावरील जखमा लॉरीच्या अपघातामुळे की मारहाणीमुळे याचा तपास पोलिस करीत आहेत.
सदर घटना दि. 25 जून रोजी पहाटे 2 वाजता झाली होती. कन्हैयालाल लोटली येथे मृतावस्थेत सापडला होता. पोलिसांनी सदर प्रकरण हीट अँड रन म्हणून नोंद केले होते.

कन्हैयालाल फोंडा येथे राहात होता. त्याला त्या रात्री फोंडा पोलिसांनी रॉबर्ट गाडीतून लोटली येथे आणून सोडले होते. पोलिसांनी त्याला त्याच्या घरी पोहचविण्याचे सोडून लोटली येथे अपघातग्रस्त ठिकाणी का सोडले असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मायणा – कुडतरी पोलिसांनी रॉबर्ट गाडीच्या चालकाची जबानी घेतल्याचे समजते. तसेच दुसऱ्या दिवशी फोंडा पोलिसांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून घेतल्याने संशय बळावला आहे. पोलिसाकडून प्रथम घातपात व त्यानंतर प्रकरण लपविण्यासाठी नंतर ‘हीट अँड रन’ नोंद केल्याचा संशय कन्हैयालाल याच्या कुटुंबियानी व्यक्त केला आहे.