हकनाक बळी

0
22

हाथरसमधील तथाकथित ‘सत्संगा’च्या वेळी झालेली भीषण चेंगराचेंगरी आणि त्यात 106 महिलांसह जवळजवळ सव्वाशे भाविकांचा गेलेला बळी ही अतिशय खिन्न करणारी घटना आहे. धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गर्दीच्या गैरव्यवस्थापनातून अशी चेंगराचेंगरी घडून शेकडोंचे बळी जाण्याची ही काही पहिली घटना नव्हे. राज्याराज्यांतून वर्षानुवर्षे अशा दुर्दैवी घटना घडत आल्या आहेत आणि तरीही आपण त्यापासून काहीही बोध घेत नाही, त्यामुळे पुन्हा पुन्हा ह्या अशा भीषण घटना घडतच राहतात. घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरत्या त्यावर चर्चा झडतात आणि पुन्हा पुढच्या दुर्घटनेपर्यंत सारे विस्मरणातही जाते. बऱ्याच वर्षांपूर्वी साताऱ्याजवळच्या मांढरदेवीच्या जत्रेत साडेतीनशे भाविकांचा चेंगराचेंगरीत बळी गेला होता. राजस्थानात जोधपूरच्या चामुंडादेवीच्या उत्सवात अडीचशे बळी गेले, मध्य प्रदेशातील रतनगढच्या नवरात्री उत्सवात 115 ठार झाले, केरळात शबरीमलाच्या यात्रेत 104 जणांचा मृत्यू झाला, हिमाचल प्रदेशातील नैनादेवीच्या यात्रेत 162 मृत्युमुखी पडले. ठिकाणे वेगळी असतात, मृतांची संख्या वेगळी असते, पण चेंगराचेंगरीची कारणे मात्र तीच असतात – आयोजनातील बेशिस्त आणि गर्दीच्या व्यवस्थापनाकडे होणारे पूर्ण दुर्लक्ष. मांढरदेवी दुर्घटनेत पायऱ्यांवर शेकडो नारळ फोडले गेल्याने पायऱ्या निसरड्या होऊन भाविक घसरून चेंगराचेंगरी झाली होती. चामुंडादेवीच्या दुर्घटनेत बॉम्बची अफवा कारण ठरली होती. रतनगढच्या दुर्घटनेत पूल कोसळणार असल्याची अफवा कारणीभूत झाली होती. एखादी वाऱ्याच्या वेगाने पसरलेली किंवा पसरवली गेलेली अफवा अशा विनाशकारी आपत्तीस कारणीभूत ठरू शकते. हाथरसमध्ये ज्या तथाकथित ‘भोले’ बाबाच्या म्हणजे ‘नारायण साकार विश्व हरी’ च्या ‘सत्संगा’साठी लाखोंची ही गर्दी जमली होती, त्याने तेथून निघून जाताना, आपल्या चरणांची धूळ घरी घेऊन जा आणि माथी लावा, तुमच्या सगळ्या समस्यांचे निराकरण होईल असा संदेश आपल्या भक्तांना दिला होता. त्यामुळे ह्या बाबाच्या वाहनांचा ताफा सत्संगाच्या ठिकाणाहून जायला निघताच त्या वाहनांच्या मार्गावरील माती गोळा करण्यासाठी एकच झुंबड उडाली. आधीच उष्णतेने हैराण झालेले भाविक, त्यात ही पळापळ यामुळे पडून, चिरडली जाऊन, श्वास कोंडून, घुसमटून माणसे किड्यामुंग्यांसारखी मारली गेली. आजकाल बाबा आणि बुवांची आपल्या देशात चलती आहे. समस्यांनी ग्रासलेली माणसे अशा लोकांच्या नादी लागतात. मग सद्सद्विवेकबुद्धी खुंटीला टांगून ठेवली जाते आणि ती अंधश्रद्धेची बळी ठरतात, वाहवत जातात. हे जे कोणी स्वतःला ‘जगत्गुरू’ म्हणवणारे बाबा आहेत, ते महाशय एकेकाळी पोलीस शिपाई होते. अठरा वर्षे शिपाईगिरी केल्यावर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि ‘बाबा’ बनले. ते जातव समाजातील असल्याने अनुसूचित जातीजमाती आणि मागासवर्गीयांमध्ये त्यांना लाखो अनुयायी लाभले. ह्या ‘बाबा’चा विशेष म्हणजे ते भगवी वस्त्रे धारण करीत नाहीत. पांढरा सूट, बूट, टाय असा त्यांचा सत्संगांवेळी पाश्चात्त्य वेष असतो. पण तरीही लाखो लोक त्यांच्या भजनी लागले आहेत. हाथरसच्या सत्संगालाही दूरदूरवरून लोक लोटले होते. समूहाचे मानसशास्त्र जाणणाऱ्या, पोपटासारखे बोलता येणाऱ्या, धर्मातील दोन चार दाखले देता येणाऱ्या अशा व्यक्ती समस्याग्रस्त समाजावर आपले गारूड पसरवतात. त्यांच्या नादी लागणाऱ्यांच्या अंगावर, आपण एका मोठ्या समूहाचा भाग बनलो आहोत या भावनेने मूठभर मांस चढते. असे धार्मिक नेते आणि त्यांचे लाखो अनुयायी ही राजकारण्यांसाठीही आयती मतपेढी असते. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय मेहेरनजर केली जाते. त्यामुळे प्रशासनही हतबल बनत असते. हाथरसच्या सत्संगाच्या ठिकाणी परवानगी घेतली गेली होती ऐंशी हजार लोकांच्या कार्यक्रमासाठी. प्रत्यक्षात लोक गोळा झाले अडीच लाख. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे स्वयंसेवक, भक्तगणांच्या येण्याजाण्यासाठी वेगळे मार्ग, आपत्कालीन प्रसंगी झटपट बाहेर पडण्याची सोय, प्रथमोपचारांसाठी वैद्यकीय पथकाची तैनाती, तेथे अद्याप उन्हाळा असल्याने मंडपात पंखे वा कूलरची व्यवस्था, पाणी आणि अन्नाची व्यवस्था ह्यातले काहीही त्या ठिकाणी नव्हते. केवळ लाखोंची गर्दी गोळा करण्यावर भर दिला गेला होता. त्यामुळे क्षणात होत्याचे नव्हते होऊन गेले. आता पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत, पण त्यात त्या ‘बाबा’चेच नाव नाही. ही असली राजकीय पाठराखण चालणार असेल तर कारवाई होणार कशी? संबंधित बाबा फरार आहे. भक्त मात्र आपले प्रियजन कायमचे गमावून बसले आहेत. अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारकडून काय केले जाणार आहे हा प्रश्न नेहमीप्रमाणेच अनुत्तरित आहे.