डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खून

0
11

>> कुठ्ठाळी येथील घटना, संशयितास अटक

दारूच्या बाटलीवरून लिओनेल लोबो (32) याचा त्याचा मित्र ॲलेक्स कुतिन्हो (34) याने डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खून करण्याची घटना कुठ्ठाळीयेथे मंगळवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी ॲलेक्स कुतिन्हो याला अटक केली आहे. आपण दारुच्या नशेत हा खून केल्याची कबुली ॲलेक्स याने दिली असून याप्रकरणी वेर्णा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सदर घटना पाजेंतर कुठ्ठाळी येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत घडली. लिओनेल ऊर्फ पिंकू याचे नातेवाईक विदेशात असल्याने ते गोव्यात परतल्यावर त्यांच्याकडे पार्थिव सोपवले जाईल. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वेर्णा पोलिसांसह पोलीस अधीक्षक सुनिता सावंत, उपअधीक्षक सलीम शेख यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. खुनाची माहिती मिळताच कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वास यांनी रात्री घटनास्थळी भेट दिली होती.

पोलीस अधीक्षक सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवड्यापूर्वी ॲलेक्स याने दारूची एक बाटली आणली होती. मद्यपान केल्यानंतर अर्धी बाटली ॲलेक्सचा विरोध झुगारून पिंकू घेऊन गेला. त्यामुळे ॲलेक्स संतापला होता. हा राग डोक्यात ठेवून आठवड्याने मंगळवारी 2 जुलै रोजी रात्री मद्यपान करून इमारतीकडे झोपलेल्या पिंकूच्या डोक्यावर सिमेंटचा ब्लॉक घालून ॲलेक्सने त्याचा खून केला. खून केल्यानंतर ॲलेक्स तेथून पळ काढण्यासाठी इमारतीबाहेर आला. तेथे असलेल्या मजुर व इतर नागरिकांना त्याने आतमध्ये पिंकूचा कोणीतरी खून करून पळून गेल्याचे सांगून त्यांची दिशाभूल केली. याबाबत माहिती मजुरांनी इमारतीचे मालक महेश बरड यांना दिली. श्री. बरड यांनी रात्री अकराच्या दरम्यान वेर्णा पोलीस स्थानकामध्ये जाऊन सदर घटनेची तक्रार केली.

पोलिसांनी चौकशीला सुरुवात केल्यावर तेथे ॲलेक्सही उपस्थित होता. त्याच्या अंगावरील कपड्यांवर तसेच हाताच्या नखांमध्ये रक्त मिळाले. त्यामुळे त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने आपण दारूच्या नशेत पिंकूचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पंचनामा करून ते ताब्यात घेतले. ॲलेक्स याला आज गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.