आगरवाडेकरांचे घर पाडल्याचे सोशल मीडियातून समजले!

0
12

>> न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जात पूजा शर्माचा दावा; आज सुनावणी

आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे घर पाडण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरून समजली, असा दावा या प्रकरणातील प्रमुख संशयित पूजा शर्मा हिने येथील उत्तर गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जात केला आहे. या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवार दि. 3 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

गुन्हा शाखेने या प्रकरणाच्या तपासासाठी पूजा शर्मा हिच्या मुंबईतील निवासस्थानी समन्स बजावला, तेव्हा ती अमृतसर येथे होती. त्यामुळेच तिने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तारीख निश्चित करण्याचा विचार करण्याची आणि 1 जुलै रोजी एसआयटीसमोर हजेरी लावण्यापासून सूट देण्याची विनंती केली होती, असेही अर्जात म्हटले आहे.

आपण 2 अल्पवयीन मुलांची आई असून, तिच्यावर दोन्ही मुले अवलंबून आहेत. आपण तपासात सहकार्य करण्यास तयार आहे, असेही पूजा शर्माने जामीन अर्जात म्हटले आहे. या प्रकरणामध्ये आपण निर्दोष असल्याचा दावा केला. आपण 5 ऑगस्ट 2023 रोजीच्या विक्रीच्या खताद्वारे 600 चौरस मीटर एवढी जमीन खरेदी केली आहे, त्याची नोंदणी 8 रोजी 2023 रोजी बार्देश उपनिबंधक कार्यालयात केली आहे, असेही जामीन अर्जात म्हटले आहे.

पाच जणांना जामीन मंजूर

म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने आसगाव येथील आगवाडेकर यांचे घर मोडतोड प्रकरणातील अर्शद ख्वाजा आणि इतर चार मिळून एकूण पाच जणांना सशर्त जामीन काल मंजूर केला. अर्शद ख्वाजा याची 25,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तत्सम रकमेच्या दोन हमीदार देण्याच्या अटीवर जामिनावर सुटका करण्यात आली. तसेच, न्यायालयाने 3 महिला बाऊन्सर आणि कारमालक अश्पाक शेख याला 20,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि एका हमीदार देण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.