>> विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा मोठा दावा; पावसाळी अधिवेशनातील पहिल्या भाषणात मोदी सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका
18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन चालू असून, काल या अधिवेशनाचा सहावा दिवस होता. पहिल्या अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर काल सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा चालू आहे. काल विरोधकांनी नीट पेपर लीक प्रकरणावरून सरकारला घेरले. त्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचा मुद्दा, नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक, अग्निवीर योजनेला देशभरातून होत असलेला विरोध, ईडी-सीबीआय व आयकर विभागाच्या धाडी, शेतकरी आंदोलन, जीएसटी, नोटबंदी तसेच इतर अनेक मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. यावेळी राहुल गांधी यांनी भर सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत पराभूत करणार असल्याचा मोठा दावा केला. आम्ही गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला पराभूत करणार. मोदीजी, तुम्ही हवे तर लिहून घ्या. विरोधकांची इंडिया आघाडी तुम्हाला गुजरातमध्ये हरवतेय. असे राहुल गांधी म्हणाले.
यावेळी खासदारांची संख्या वाढल्यामुळे काँग्रेस तसेच विरोधकांची ताकद वाढली आहे. लोकसभेत विरोधक अधिक आक्रमक दिसत आहेत. राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याने काँग्रेसलाही बळ मिळाले आहे. काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी तुफान भाषण केले. राहुल गांधी लोकसभेत अग्नीवीर, जीएसटी अशा मुद्द्यांवर बोलत होते. ते गुजरातचा संदर्भ देऊन बोलत असताना सत्ताधारी बाकांवरून त्यांना टोकले जात होते. त्यावेळी त्यांनी सदर विधान केले. आम्ही तुम्हाला यावेळी गुजरातमध्ये हरवणार आहोत. तुम्ही हे माझ्याकडून लिहून घ्या. आम्ही इंडिया आघाडी तुम्हाला यावेळी गुजरातच्या निवडणुकीत पराभूत करून दाखवणार आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.
मोदी अयोध्येत लढले असते, तर पराभूत झाले असते!
अयोध्यावासियांच्या मनात नरेंद्र मोदी यांनी भय निर्माण केले. त्यांची जमीन घेतली. त्यांची घरे पाडली. त्यानंतर सामान्य अयोध्यावासियांना मंदिर उद्घाटनावेळी दूर ठेवले. यामुळेच अयोध्येच्या जनतेने निवडणुकीत त्याचा वचपा काढला. तसेच नरेंद्र मोदी यांनी दोन वेळा अयोध्येतून निवडणूक लढविण्यासाठी सर्व्हे केला. दोन्ही वेळा सर्व्हे करणाऱ्यांनी त्यांना अयोध्येतून निवडणूक लढविण्यास विरोध केला. जर ते तिथून लढले असते तर त्यांचा पराभव झाला असता, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.