स्पर्धा परीक्षांच्या आयोजनातील कथित अनियमिततांवरून पुढे ढकलण्यात आलेल्या नेट परीक्षेच्या नव्या तारखा विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केल्या आहेत. यूजीसी-नेट परीक्षा आता 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा 18 जून रोजी घेण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी परीक्षा रद्द करण्यात आली होती. नेट पेपर फुटल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाला मिळाल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने यूजीसी नेट परीक्षा रद्द केली होती. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत घेण्यात आली होती. दरम्यान, रद्द झालेल्या यूजीसी नेट परीक्षेची नवी तारीख एनटीएने जाहीर केल्या आहेत. नव्या तारखानुसार ही परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत घेतली जाणार आहे. रद्द झालेल्या परीक्षेला देशभरातून 9 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापा होता. ही परीक्षा पुन्हा कधी होणार, याची विचारणा विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली होती.