लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा ओम बिर्ला

0
6

>> विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची निवड

18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भातील घोषणा केली. आवाजी मतदानाने ही निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील. मंगळवारी (25 जून) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पक्षाने ही घोषणा केली. भाजपचे उमेदवार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे. मंगळवारी 25 जून रोजी संध्याकाळी सत्ताधारी पक्ष आणि विरोधक एकमत होऊ न शकल्याने त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. इंडिया आघाडीच्या वतीने के. सुरेश यांनी अर्ज केला होता.

लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एनडीएकडून ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांचे नाव अध्यक्षपदासाठी मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सत्ताधारी एनडीएच्या 13 घटक पक्षांनी देखील प्रस्ताव मांडला.
के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मांडला. बिर्ला यांची आवाजी मतदानाने अध्यक्षपदी निवड झाली. बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.

बिर्ला हे राजस्थानातील कोटा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. याशिवाय त्यांनी 17 व्या लोकसभेत देखील लोकसभा अध्यक्ष म्हणून काम केले आहे. हंगामी अध्यक्ष बतृहारी महताब यांनी ओम बिर्ला यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. मोदी आणि गांधी यांनी अध्यक्षपदांना त्यांच्या खुर्चीपर्यंत सोबत केली आणि त्यांच्या साक्षीने ओम बिर्ला यांनी लोकसभेच्या अध्यक्षपदाची खुर्ची स्वीकारली.

विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील. मंगळवारी (25 जून) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पक्षाने ही घोषणा केली. यानंतर काँग्रेस संसदीय मंडळाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब यांना यासंदर्भात पत्र लिहिले. 20 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत राहुल पहिल्यांदाच घटनात्मक पद भूषवणार आहेत. हे पद भूषवणारे ते गांधी कुटुंबातील तिसरे सदस्य असतील. याआधी त्यांचे वडील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी हे पद भूषवले होते.