अमेरिकेशी झालेल्या समझोत्यानंतर ज्युलियन असांजची ब्रिटनच्या बेलमार्श तुरुंगातून तब्बल 1901 दिवसांनी झालेली मुक्तता ही अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठीच्या जागतिक लढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे. ‘विकीलिक्स’च्या माध्यमातून लाखो गोपनीय लष्करी कागदपत्रे उघड करून अमेरिकेला जगापुढे उघडे पाडणाऱ्या असांजला धडा शिकवण्यासाठी त्या महासत्तेने आजवर जंग जंग पछाडूनही शेवटी जगभरातील समर्थकांच्या दबावापोटी हा समझोता करणे तिला भाग पडले आहे. गेले 62 महिने कारावास भोगलेल्या असांजला त्याच्याविरुद्धच्या 18 पैकी एका प्रकरणात तेवढ्याच काळासाठीची कारावासाची शिक्षा सुनावून ह्या साऱ्या प्रकरणावर पडदा पाडण्याची तयारी अमेरिकेने आता दाखवलेली आहे. त्यामुळे असांज ऑस्ट्रेलियातील आपल्या घरी परतायला मोकळा असेल. असांजच्या मुक्ततेसाठीची जागतिक मोहीम हा आधुनिक इतिहासातील आविष्कारस्वातंत्र्यासाठीचा एक फार मोठा लढा ठरला. त्यामध्ये नाना वळणे आली, वाद उद्भवले, वाटाघाटी झाल्या, परंतु ह्या सर्वांच्या शेवटी सत्य जिंकले आहे. असांजने अमेरिकेची जी सात लाख गोपनीय लष्करी कागदपत्रे जगापुढे उघड केली, त्यातून त्या महासत्तेचा खरा राक्षसी चेहरा समोर आला. विशेषतः जगाला मानवाधिकारांचे पाठ पढवणाऱ्या अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तानमध्ये केलेली बेछूट दांडगाई, मानवाधिकारांचे केलेले हनन ह्या सगळ्यातून प्रकर्षाने व पुराव्यांनिशी जगासमोर येऊ शकले. त्यातही, इराक युद्धादरम्यान बगदादमध्ये निष्पाप नागरिकांवर हेलिकॉप्टवरून गोळीबार कसा केला गेला होता त्या व्हिडिओने तर अवघ्या जगाला अस्वस्थ केले. रॉयटरच्या दोघा पत्रकारांचाही त्या बेछूट गोळीबारात बळी गेला होता. ‘विकीलिक्स’ सारखे एखादे यःकश्चित संकेतस्थळ अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेला उघडे पाडू शकले ह्यात आजच्या माहिती तंत्रज्ञानामध्ये केवढी प्रचंड ताकद दडलेली आहे हेही प्रखरपणे जगासमोर आले. असांज आणि त्याला ही सर्व गोपनीय माहिती पुरवणारी चेल्सी मॅनिंग हिला उर्वरित आयुष्यभरासाठी काळकोठडीत डांबण्याच्या हालचाली अमेरिकेने केल्या खऱ्या, परंतु जनतेचा दबाव एवढा मोठा ठरला की आधी चेल्सीची बराक ओबामांनी सात वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुक्तता केली आणि आता असांजलाही सोडण्याची पाळी विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्यावर आली आहे. असांजचा गळा दाबण्यासाठी महासत्ता अमेरिका उतावीळ होती. 1917 मधील जुन्यापुराण्या हेरगिरी कायद्याखाली असांजवर खटले भरले गेले. त्याच्याविरुद्ध असे गुन्हे लावले गेले की ज्यांची शिक्षा भोगायची झाली तर त्याला 175 वर्षांचा आजीवन कारावास भोगावा लागला असता. त्याच्याविरुद्ध लैंगिक दुर्व्यवहाराचे एक प्रकरण मध्यंतरी उपस्थित करण्यात आले. असांजच्या स्वीडनमध्ये प्रत्यार्पणाचे प्रयत्न करण्यात आले. सुदैवाने इक्वाडोर ह्या दक्षिण अमेरिकेतील एका छोट्याशा देशाने आपल्या लंडनच्या दूतावासात असांजला आश्रय दिला. तो तेथून कधी बाहेर पडतो आणि त्याला कधी एकदा अटक करतो ह्यासाठी जय्यत मोर्चे लावण्यात आले होते. शेवटी इक्वाडोरने त्याला दिलेले अभयदान मागे घेतले आणि असांजवर ब्रिटनच्या तुरुंगात सडण्याची पाळी ओढवली. अमेरिकेने त्याला आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रत्यार्पणाची मागणी केली. त्याविरुद्ध प्रदीर्घ न्यायालयीन लढा असांजला लढावा लागला. सुरवातीला त्याची आव्हान याचिकाही स्वीकारण्यात आली नव्हती, परंतु नंतर अमेरिकेने सादर केलेली कागदपत्रे अपुरी असल्याचा साक्षात्कार न्यायालयाला झाला आणि त्याची आव्हान याचिका दाखल करून घेतली गेली. ह्या सगळ्या लढाईत ज्युलियन असांज हे आविष्कारस्वातंत्र्याचे एक प्रतीक बनून गेले होते. त्यामुळे त्याची पाठराखण करण्यासाठी जगभरातून स्वयंसेवी संघटना आणि कार्यकर्ते उभे राहिले. त्याच्या वतीने ते ही प्रदीर्घ लढाई लढले. ऑस्ट्रेलियाच्या सरकारनेही त्याच्या सुटकेची मागणी लावून धरली आणि बायडन प्रशासनालाही त्यावर विचार करू असे आश्वासन देणे भाग पडले. ब्रिटीश न्यायालयाने असांजला आता जामीनमुक्त केले आहे. अमेरिकेने जागतिक दबावापोटी आता त्याच्याविरुद्धच्या एकूण 18 आरोपांपैकी एकाच आरोपाखाली त्याच्यावर खटला भरून हे प्रकरण निकाली काढण्याची तयारी दर्शवलेली आहे. त्यामुळे आपल्या गुन्ह्याची असांज कबुली देईल आणि त्याला प्रतिकात्मक शिक्षा देऊन हा विषय संपवला जाईल. आविष्कारस्वातंत्र्यावर ठाम श्रद्धा असलेली एखादी व्यक्ती महासत्ता अमेरिकेलाही नमवू शकते ह्याचा दाखला ह्यानिमित्ताने प्रस्थापित झाला आहे.