आसगाव प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई होणार : मुख्यमंत्री

0
5

आसगाव येथे तीन दिवसांपूर्वी बुलडोझरद्वारे बेकायदेशीररित्या आगरवाडेकर पिता-पुत्राचे घर पाडणाऱ्या व त्यांचे अपहरण करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले. गोव्यात येऊन अशी कृत्ये करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. दरम्यान, हणजूण पोलिसांनी या प्रकरणी बुलडोझरचालक आणि एका दलालाला अटक केली आहे.
जमिनीच्या वादातून दिल्लीस्थित एक महिलेने आल्त-आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे निवासी घर गुंडांच्या मदतीने जेसीबीचा वापर करून पाडले होते. यावेळी संशयितांनी प्रदीप आगरवाडेकर व त्यांच्या पुत्राचे अपहरणही केले होते. प्रदीप आगरवाडेकर व त्यांच्या पुत्राची अपहरणकर्त्यांनी सुटका केली आहे. हणजूण पोलिसांनी संशयित महिला व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

पूजा शर्माला अटक करा ः लोबो
पूजा शर्मा ही या प्रकरणातील प्रमुख संशयित असून, तिला ताबडतोब अटक करा, अशी मागणी आमदार डिलायला लोबो यांनी केली आहे.

पूजा शर्माला 24 तासांत अटक करा : पाटकर
या प्रकरणी भाजप सरकारने केवळ बुलडोझरचा चालक आणि तथाकथित दलालाला अटक केली, हे धक्कादायक आहे. सदर घटनेची मुख्य सूत्रधार पूजा शर्माला 24 तासांत अटक करावी, अशी आमची मागणी आहे. सरकारने असे न केल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला.

चौकशी समिती नेमा : आलेमाव
या भयंकर गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांखाली उच्चस्तरीय चौकशी समिती त्वरित स्थापन करावी आसगावचे जमीन बळकाव प्रकरण हे भाजप आश्रय देत असलेल्या भूमाफिया आणि रिअल इस्टेट माफियांचे आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.
दरम्यान, काल अमित पाटकर, युरी आलेमाव, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, ॲड. रमाकांत खलप, अमरनाथ पणजीकर, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, शिवोली गट अध्यक्षा पार्वती नागवेकर, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विवेक डिसिल्वा या काँग्रेस शिष्टमंडळाने आसगाव येथे आगरवाडेकर कुटुंबीयांची भेट घेतली.

विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका
दिल्लीतील भू-माफिया आता राज्यात येऊन दिवसाढवळ्या गोमंतकीयांची घरे बुलडोझरद्वारे पाडू लागले असून, गोवा सरकार मात्र बघ्याची भूमिका घेऊ लागले असल्याचा आरोप काल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व आमदार विजय सरदेसाई यांनी केला. या घटनेवरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे हे सिद्ध होत असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे.