>> निवडणुकीमुळे काँग्रेसकडून सर्व खासदारांना व्हिप; ओम बिर्ला व के. सुरेश यांच्यात लढत
संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून, अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. सर्व नवनिर्वाचित खासदारांचा शपथविथी पार पडला. मात्र, लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून अटीतटीचे राजकारण पाहण्यास मिळत आहे. एनडीएकडून ओम बिर्ला यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच इंडिया आघाडीकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस खासदार के.सुरेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता लोकसभा अध्यक्षपदासाठी आज (बुधवार, दि. 26) सकाळी 11 वाजता निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आता सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. काँग्रेसने व्हिप जारी करत बुधवारी सर्व खासदारांना संसदेत हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तीन ओळीचा हा व्हिप असून काँग्रेस पक्षाच्या सर्व खासदारांना बुधवारी सकाळी 11 वाजता सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सकाळी 11 वाजेपासून ते संसदेचे कामकाज संपेपर्यंत सभागृहात हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकसभेत बुधवारी महत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात येईल, त्यासाठी काँग्रेसच्या सर्व खासदारांनी संसदेत उपस्थित राहावे, असे व्हिप जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.
भारताचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहता याआधी फक्त दोन वेळा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली आहे. त्यात सर्वात पहिली 1952 ची निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. तसेच आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत अशाच प्रकारे अध्यक्षपदावर सहमती न झाल्यामुळे निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतर थेट यावेळी लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी एनडीए आणि विरोधकांमध्ये एकमत झाल्याचे बोलले जात होते; मात्र इंडिया आघाडीकडून उपाध्यक्षपदासाठी आग्रह धरला जात होता. उपाध्यक्षपद देण्यास एनडीएने नकार दिल्यामुळे इंडिया आघाडीकडून अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्यात आला आहे.