कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनासंदर्भात काल अंतिम निकाल देत दिल्लीच्या सत्र न्यायालयाने दिलेल्या जामिनावर दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती कायम ठेवली. तसेच या प्रकरणात सविस्तर सुनावणी होण्याची गरज असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता केजरीवाल यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. या सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयावर ताशेरे ओढले.
अरविंद केजरीवाल हे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांना दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू सत्र न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला होता; मात्र या निर्णयाविरोधात ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत जामिनाला विरोध केला होता. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला स्थगिती दिली. त्यानंतर जामीन स्थगितीच्या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, जामिनावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत जामीन देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.
काल अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती कायम ठेवली. तसेच यावेळी उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयावर ताशेरे ओढले. सत्र न्यायालयाने ईडीला आपली बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी होती, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.