22 दिवसांत 24.49 इंच पाऊस

0
5

राज्यात आज, उद्या केशरी अलर्ट

राज्यात मोसमी पाऊस इंचाच्या पाव शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला असून जून महिन्याच्या 22 दिवसांत एकूण 24.49 इंच पावसाची नोंद झाली आहे. येथील हवामान विभागाने आज सोमवार दि. 24 आणि उद्या मंगळवार दि. 25 जून रोजी पावसाची शक्यता वर्तविली असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच, आज 24 जूनला उत्तर गोव्यातील समुद्रात पणजी ते चोपडेपर्यंत उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तविली आहे. अंदाजे 2.9 ते 3.3 मीटरपर्यंत उंच लाटा उसळू शकतात. किनारी भागातील नागरिक व व्यावसायिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात चोवीस तासांत पावसाचे प्रमाण कमी नोंद झाले असून 0.86 इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे सर्वाधिक 1.23 इंच पावसाची नोंद झाली. जुने गोवा आणि मुरगाव येथे प्रत्येकी 1.17 इंच, पणजी येथे 1.12 इंच, काणकोण येथे 1.07 इंच, साखळी येथे 0.94 इंच अशा पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात सांगे येथे आत्तापर्यंत सर्वाधिक 29.26 इंच पावसाची नोंद झाली आहे. तर, साखळी येथे 28.89 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 3 टक्के कमी आहे. उत्तर गोव्यात पावसाचे प्रमाण 11 टक्के कमी नोंद झाले आहे. तर, दक्षिण गोव्यात पावसाचे प्रमाण 5 टक्के जास्त नोंद झाले आहे.

राज्यात पंधरा दिवसांत 371 पडझडीच्या घटना
राज्यभरात मागील पंधरा दिवसात पावसामुळे झाडांच्या पडझडीच्या एकूण 371 घटनांची नोंद झाली आहे. या पडझडीमुळे सुमारे 17 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, 77 लाख 7 हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात आल्याची अशी माहिती अग्निशामक दलाने दिली आहे.

पाणीसाठ्यात वाढ नाही
प्रमुख धरणातील जलसाठ्यात मोठी वाढ झालेली नाही. सत्तरीतील अंजुणे धरणामध्ये 17 टक्के, फोंडा तालुक्यातील पंचवाडी धरणात 21 टक्के, दक्षिण गोव्यातील साळावली धरणामध्ये 38 टक्के पाण्याचा साठा आहे. डिचोलीतील आमठाणे धरणामध्ये 40 टक्के पाण्याचा साठा आहे.