दोन रेल्वेंची धडक; 9 जण ठार

0
13

>> पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे कंचनजंगा एक्स्प्रेस व मालगाडीची धडक

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुडी येथे काल सकाळी 9 च्या सुमारास कंचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीची जोरदार धडक बसली. या दुर्घटनेत एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मालगाडीचे दोन लोको पायलट आणि कंचनजंगा एक्स्प्रेसच्या एका गार्डचा समावेश आहे. तसेच या अपघातात 41 जण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या अपघातात कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अनेक डब्यांचे नुकसान झाले. या अपघाताचे वृत्त समोर येताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळावर जात पाहणी केली.

कंचनजंगा एक्स्प्रेस आगरतळाहून पश्चिम बंगालमधील सियालदहला जात होती. लाल सिग्नलमुळे एक्स्प्रेस ट्रेन सिलीगुडीतील रंगापानी स्टेशनजवळ रुईधासा येथे थांबवण्यात आली. त्याचवेळी मागून येणाऱ्या मालगाडीने त्या एक्स्प्रेसला धडक दिली. मुसळधार पावसामुळे मालगाडीच्या पायलटला सिग्नल दिसला नाही. त्यामुळे हा अपघात झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दोन्ही रेल्वेंची टक्कर इतकी जोरदार होती की एक्स्प्रेस ट्रेनचा एक डबा मालगाडीच्या इंजिनला हवेत लटकला. इतर दोन डबे रुळावरून घसरले. अपघातानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफसह रेल्वे आणि बंगालचे अधिकारीही बचाव कार्यात गुंतले होते.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी तातडीने पश्चिम बंगाल सिलीगुडीतील रंगापानी स्टेशनजवळ घटनास्थळावर भेट देत पाहणी केली. मोठी वाहने जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्याने अपघातस्थळी जाण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना मोटारसायकलने जावे लागले.

पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीकडून 2 लाख रुपयांचे आणि जखमींना 50,000 रुपयांचे सहाय्य पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले आहे. पश्चिम बंगालमधील झालेला रेल्वे अपघात फारच दुःखद आहे. आपले प्रियजन गमावलेल्या लोकांप्रती माझ्या संवेदना आहेत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

सरकारकडून मदत जाहीर
पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली. त्यानुसार, मृतांच्या नातेवाईकांना 10-10 लाख रुपये देण्यात येणार आहे. गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.