>> वीजमंत्री सुदिन ढवळीकर; केंद्रीय वीज मंत्रालयाला अनेक प्रस्ताव सादर
मागील दोन वर्षांपासून राज्यात भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. येत्या तीन वर्षांत भूमिगत वीजवाहिन्यांचे काम पूर्ण होणार आहे. राज्यातील वीज साधनसुविधा वाढविण्यासंबंधीचे अनेक प्रस्ताव केंद्रीय वीज मंत्रालयाला सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल दिली.
राज्यात वीज निर्मिती प्रकल्प आणि साधन सुविधांच्या विकासासाठी केंद्रीय वीजमंत्री मनोहर लाल खट्टर, राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. हरित ऊर्जेला चालना मिळावी म्हणून केंद्रीय अपारंपरिक ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांचेही सहकार्य घेतले जाणार आहे, असे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
उत्तर गोव्यातून सलग सहाव्यांदा निवडून आलेले श्रीपाद नाईक यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात वर्णी लागल्याबद्दल त्यांचे सुदिन ढवळीकर यांनी अभिनंदन केले.
राज्यातील वीज साधनसुविधा वाढविण्यासंबंधीचे अनेक प्रस्ताव केंद्रीय वीज मंत्रालयाकडे सादर केले आहेत. श्रीपाद नाईक यांच्या माध्यमातून मनोहर लाल खट्टर यांची भेट घेऊन विकास प्रकल्पांचा पाठपुरावा केला जाणार आहे, असेही ढवळीकर म्हणाले.
राज्यात विजेची मागणी वाढत आहे. त्यामुळे नवीन साधनसुविधा निर्माण करताना जुन्या साधनसुविधांचे नूतनीकरण करण्याची गरज आहे. जुन्या विजेच्या तारा, ट्रान्स्फॉर्मर बदलण्याची गरज आहे. मागील दोन वर्षांपासून भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सुरू असून, पुढील तीन वर्षांत ते पूर्णत्वास येईल. राज्यात नवीन वीज उपकेंद्र तयार करण्याची गरज आहे. राज्याला परराज्यातून मिळणाऱ्या विजेवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे वीज निर्मिती प्रकल्पांच्या विषयावर विचारमंथन केले जाणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.
राज्य सरकारने हरित वीज निर्मितीवर भर दिला आहे. श्रीपाद नाईक यांच्याकडे अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचाही ताबा आहे. त्यामुळे हरित ऊर्जा निर्मितीसाठी देखील त्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.