ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन झाले असून, 52 वर्षीय मोहन चरण माझी यांनी बुधवारी राज्याचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री कनकवर्धन सिंहदेव (67) आणि प्रभावती परिदा (57) यांनीही शपथ घेतली.
माझी यांच्यासमवेत 13 मंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यामध्ये सुरेश पुजारी, रबीनारायण नाईक, नित्यानंद गोंड, कृष्ण चंद्र पत्रा, पृथ्वीराज हरिचंदन, मुकेश महालिंग, बिभूती भूषण जेना, कृष्ण चंद्र महापात्रा, गणेश रामसिंग खुंटिया, सूर्यवंशी सूरज, प्रदीप बलसामंता, गोकुळा नंद मल्लिक आणि संपद कुमार स्वेन यांचा समावेश आहे.
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, अमित शहा उपस्थित होते. तसेच उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आसाम, हरियाणा, गोवा आणि उत्तराखंड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही शपथविधीला उपस्थिती लावली.