ऑक्टोबरपर्यंत आणखी 3-4 खाणी सुरू होणार

0
11

>> ‘मुख्यमंत्री कार्यालया’ने दिली माहिती; मुख्यमंत्र्यांकडून फेरआढावा बैठक

राज्य सरकारने लिलाव केलेल्या खाणींपैकी 3 ते 4 खाणी येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत सुरू होऊ शकतील, अशी माहिती काल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून मिळाली. दरम्यान, यापूर्वी लिलाव झालेल्या एका खाणीतून उत्खननास सुरुवात झाली आहे. वेदांता सेसा गोवा कंपनीने डिचोलीतील खाणपट्ट्यातून 4 एप्रिलपासून खनिज उत्खननाच्या कामास सुरुवात केली होती.

राज्यातील ज्या 9 खाणींचा लिलाव करण्यात आलेला आहे, त्या कधीपर्यंत सुरू होऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाण खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि खाणीशी संबंधित वेगवेगळ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांची एक फेरआढावा बैठक घेतली.
या खाण सुरू करण्यासाठी जे वेगवेगळे दाखले हवे आहेत, ते दाखले आणि परवाने मिळवण्यासाठीच्या कामांना गती देण्याची सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

लिलाव झालेल्या 9 खाणींपैकी किमान 3 ते 4 खाणी येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांपर्यंत सुरू करणे शक्य आहे असे फेरआढावा बैठकीतून मुख्यमंत्र्यांना दिसून आले आहे, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी काल घेतलेल्या खाणीसंबंधीच्या फेरआढावा बैठकीला खाण खात्याचे अधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पर्यावरण खात्याचे अधिकारी, वन खात्याचे अधिकारी, तसेच लिलावाद्वारे खाणी मिळवलेल्या 9 लीजधारकांचा समावेश होता. राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाला खाणींना पर्यावरणीय मंजुरी देण्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी खाण लिजधारकांना श्री लईराई मंदिर व मंदिराच्या आजूबाजूला जो लोकवस्तीचा भाग आहे, तो खाण क्षेत्रातून वगळण्याची सूचना केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. श्री देवी लईराई मंदिर व तेथील लोकवस्तीचा भाग हा या लिलाव केलेल्या खाणपट्ट्यातून वगळण्यात यावा, अशी मागणी स्थानिक लोकांनी केली होती.

राज्याचा आर्थिक कणा अशी ओळख असलेला खाण उद्योग 2012 सालापासून बंद असून, त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीबरोबरच खाण व्यवसायावर अवलंबून असलेल्या खाण पट्ट्यांतील सुमारे 3 लाख खाण अवलंबितांच्या उदरनिर्वाहावर परिणाम झालेला आहे.