क्रेनखाली सापडून पायलट जागीच ठार

0
32

फोंडा येथील कदंब बसस्थानकावर मंगळवारी सकाळी भुयारी मार्गाजवळ काम करीत असलेल्या क्रेन खाली सापडल्याने एका 58 वर्षीय मोटरसायकल पायलटचा जागीच मृत्यू झाला. प्रकाश चोडणकर (रा. कवळे-फोंडा, मूळ कवठण-सातार्डा) असे मृत मोटरसायकल पायलटचे नाव आहे. प्रकाश चोडणकर हे गेल्या काही वर्षांपासून बसस्थानकावर पायलट म्हणून काम करीत होते. क्रेनचालकाचे नियंत्रण गेल्याने पहिल्यांदा प्रवासी बसला धडक दिल्यानंतर क्रेन पार्क केलेल्या दुचाकीच्या दिशेने गेल्याने अपघात घडला. या प्रकरणी क्रेनचालक रणजित नागेंद्र कुमार (20, रा. बिहार) याला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे.

प्राप्त माहीतीनुसार, भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी फर्मागुडी येथून क्रेन बसस्थानकाजवळ आली. त्यावेळी बसस्थानकावर आलेल्या एका प्रवासी बसला क्रेनची धडक बसली आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रेन दुचाकी पार्क केलेल्या दिशेने गेली. त्यावेळी भाडे मिळविण्याच्या प्रतीक्षेत असलेले प्रकाश चोडणकर हे मोटारसायकलसह क्रेन खाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दुपारी उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. संध्याकाळी वारखंडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रकाश चोडणकर हे गेल्या काही वर्षांपासून कवळे येथे भाड्याच्या खोलीत कुटुंबासह राहत होते. प्रकाश चोडणकर यांच्या सासूचा 15 दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून ते कदंब बसस्थानाकावर गेले नव्हते; परंतु मंगळवारी सकाळी भाडे मारण्यासाठी गेले असता त्यांना मृत्यूने गाठले. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे कळताच कवळे व दुर्गाभाट परिसरात शोककळा पसरली.