जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून 33 जण जखमी झाले आहेत. नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान हा दहशतवादी हल्ला झाला. रियासी जिल्ह्यातील कांडा भागात हा दहशतवादी हल्ला झाला.
घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू आहे. अपघातात जखमी झालेल्या अनेक भाविकांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. भारतीय लष्कर, सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधात शोधमोहीम सुरू केली आहे. ही घटना जम्मू-काश्मीरमधील रियासी भागात घडली आहे. शिवखोडी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविक माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी बसने कटरा येथे जात होते. बस जंगल परिसरात पोहोचताच दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारामुळे बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खड्ड्यात पडली. बसमध्ये जवळपास 50 भाविक होते. ज्या दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर हल्ला केला, ते सर्व राजौरी, पूंछ आणि रियासी भागात लपून बसले असून, सुरक्षा दलाने त्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.
बसमधील इतर प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. प्रवासी हे स्थानिक नसून बाहेरून आलेले आहेत. सुरक्षा दलांनी सुरक्षित करून परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे.