>> काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप; नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या सल्ल्यामुळे गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी रुपये बुडाले
लोकसभा निवडणूक निकालापूर्वी वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम झाला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही थेट सहभाग आहे. मोदी आणि शहांच्या सल्ल्यामुळे अनेकांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली; मात्र निकालाच्या दिवशी शेअर बाजारात अभूतपूर्व पडझड झाली आणि गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटींचे नुकसान झाले. निकालाच्या दिवशी शेअर बाजारात झालेल्या या सर्वात मोठ्या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले, तर इंडिया आघाडीला 233 जागा मिळाल्या. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आधी एक्झिट पोल समोर आले होते. या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपला 300 ते 350 च्या वर जागा दाखवल्या होत्या. त्यानंतर शेअर मार्केट अचानक मोठ्या प्रमाणात वाढले होते; मात्र 4 जूनला निवडणूक निकालानंतर शेअर मार्केट अचानक खाली पडले. त्यामुळे गुंतवणूकदारांना जवळपास 30 लाख कोटी रुपयांचा फटका बसला. यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाष्य केले.
मोदी-शहांसाठी काम करणारे एक्झिट पोलर्स आणि अनुकूल माध्यमांनी मिळून देशातील सर्वात मोठा ‘स्टॉक मार्केट घोटाळा’ करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. निवडणुकीच्या आधी एक्झिट पोल समोर आले तेव्हा शेअर मार्केट अचानक वाढले; मात्र निकालाच्या दिवशी शेअर मार्केट अचानक पडले; पण त्याआधी निवडणूक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि निर्मला सीताराम यांनी गुंतवणूकदारांना शेअर खरेदी करण्यासाठी सांगितले होते, याची आठवण राहुल गांधींनी करून दिली. त्यांनी लोकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लावली; पण 4 जून रोजी काय होणार? निवडणुकीचे निकाल काय येणार? हे त्यांना माहिती होते. हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
4 जूनला शेअर बाजारात नेमके काय घडले?
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी 4 जून रोजी सेन्सेक्स 4389 अंकांनी (5.74%) कोसळला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 31 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. पडझडीमुहे 4 जून रोजी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 395 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. जे एका दिवसापूर्वी सुमारे 426 लाख कोटी रुपये होते.