पणजीत पार्किंग शुल्कामध्ये कोणतीही वाढ नाही : महापौर

0
12

पणजी महानगरपालिका क्षेत्रातील वाहन पार्किंग शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. पार्किंग शुल्क वसूल करणाऱ्या कंत्राटदाराला शुल्काची माहिती देणारे फलक उभारण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी काल दिली.

शहरातील विविध भागातील पार्किंग शुल्काची माहिती देणाऱ्या फलकांची नासधूस झालेली आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून पार्किंग शुल्क वसूल करताना लुबाडणूक केली जात असल्याची तक्रार आहे. तसेच, कंत्राटदाराने पार्किंग शुल्क वसुल करण्यासाठी नियुक्त केलेले काही कर्मचारी शुल्क वसूल करताना वाहनचालकांशी असभ्य वर्तन करीत आहेत, अशीही तक्रार आहे.

पार्किंग शुल्क वसूल करणाऱ्या कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांबाबत महानगरपालिकेकडे तक्रार केल्यास कंत्राटदारामार्फत आवश्यक कारवाई केली जाऊ शकते, असे मोन्सेरात यांनी सांगितले.

शहरातील विविध भागात पार्किंग शुल्काची माहिती देणारे लावण्यात आलेले फलक खराब झाल्याचे निदर्शनास आले असून, कंत्राटदाराला नोटीस पाठवून पार्किंग शुल्काची माहिती देणारे नवीन फलक शहरात ठिकठिकाणी उभारण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.