दक्षिणेत काय घडले?

0
23

लोकसभा निवडणुकीचे निकाल जसे सर्वत्र धक्कादायक लागले, तसाच प्रकार गोव्यातही झाला. भारतीय जनता पक्षाचे पंधरा आमदार असूनही दक्षिण गोव्याच्या पक्षाच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांना पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसमधून भाजपात घाऊकपणे घेतल्या गेलेल्या आमदारांचे त्यांच्या मतदारांतील स्थान काय राहिले आहे, त्याची जळजळीत जाणीव भाजपला हा निकाल करून देईल अशी अपेक्षा आहे. धर्मगुरूंच्या राजकीय ढवळाढवळीचे कारण भाजपने ह्या निकालावर प्रतिक्रिया देताना पुढे केलेले असले, तरी त्याच बरोबर पक्षांतर केलेल्या आमदारांबरोबर त्यांचा मतदार नाही हेही ह्या निकालांतून विशेषतः सालसेतमध्ये दिसून येते आहे आणि त्याची दखल पक्षाला घ्यावी लागेल. ज्या आमदारांना आपल्या पक्षाच्या उमेदवारास आपल्या विधानसभा मतदारसंघक्षेत्रात बहुमत तर दूरच, किमान अपेक्षित मतेही मिळवून देता आली नाहीत, त्यांना मंत्रिपदावर ठेवण्याची गरजच काय? नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना भाजप सरकारमध्ये मारे मंत्रिपद दिले गेले होते. त्यांच्या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला भाजप उमेदवाराच्या तिप्पट मते मिळाली आहेत. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी पक्षाच्या उमेदवारासाठी काम जरूर केले, परंतु ते त्यांना किरकोळ आघाडीच मिळवून देऊ शकले ह्याचा अर्थ काय? आपल्या विजयामागे ‘पाच पांडव’ असल्याची सार्थ प्रतिक्रिया विरियातो फर्नांडिस यांनी दिली. हे पाचजण म्हणजे काँग्रेसचे युरी आलेमाव, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, आम आदमी पक्षाचे दोन्ही आमदार अनुक्रमे बाणावलीचे वेन्झी व्हिएगस आणि वेळ्ळीचे क्रुज सिल्वा आणि गोवा फॉरवर्डचे नेते व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई. ह्या पाचजणांनी काँग्रेस उमेदवार विरियातो यांना भरभक्कम आघाडी आपापल्या मतदारसंघातून मिळवून दिली आणि त्यांचा विजय सुकर केला. विशेषतः आम आदमी पक्षाच्या दोन्ही आमदारांनी आपल्या मतदारसंघातून ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारास प्रचंड मताधिक्क्य मिळवून दिलेले दिसते. बाणावलीत भाजप उमेदवारापेक्षा काँग्रेस उमेदवाराला मिळालेली मते जवळजवळ सात पट आहेत. वेळ्ळीमध्येही काँग्रेसला चौपट मते मिळाली आहेत. सालसेत हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला व त्यातील सातही विधानसभा मतदारसंघ हे ख्रिस्तीबहुल असल्याने भाजपपासून ते दूर राहत आलेले प्रत्येक निवडणुकीत दिसते. त्यात ह्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या हिंदुत्ववादी चेहऱ्यामुळे ख्रिस्ती मतदारांना मोदींच्या पुनरागमनात आडकाठी आणण्याचा संदेश धर्मगुरूंकडून दिला गेला होता. त्यात मनोहर पर्रीकरांच्या काळात राबवले गेलेले ‘मिशन सालसेत’, त्यातून ख्रिस्तीधर्मीयांमध्ये निर्माण झालेला विश्वास ह्या सरकारमध्ये काडीलाही दिसत नाही. केवळ ख्रिस्ती आमदार पक्षात घेतले म्हणजे ख्रिस्ती मतदारांचा विश्वास जिंकता येत नाही. त्यामुळे ह्या निवडणुकीत दक्षिण गोव्यात तरी अल्पसंख्यक मतदारांनी एकगठ्ठा विरोधात मतदान केले आणि भाजपचा विजय दूर गेला. पक्षाच्या उमेदवार राजकारणात नवख्या असल्याने त्यांना जिंकून आणण्याची संपूर्ण जबाबदारी पक्षाची होती, त्यात पक्षाचे आमदार कमी पडले. दक्षिणेतील हिंदुबहुल मतदारसंघांतून मोठे मताधिक्य मिळवण्याचा मनसुबा मडगाव, मुरगाव, वास्कोसारख्या भरवशाच्या ठिकाणी तडीस गेला नाही. त्याचा फटका राजकारणात नव्यानेच पदार्पण केलेल्या पल्लवी यांना बसला. दक्षिण गोव्याच्या तुलनेत उत्तर गोव्याचा विजय पक्षासाठी सोपा होता, कारण श्रीपाद नाईक यांचे अजातशत्रुत्व, त्यात विश्वजित राणे, जीत आरोलकर, चंद्रकांत शेट्ये यांच्यासारख्यांनी त्यांना प्रचंड बहुमत मिळवून देण्याचा उचललेला विडा ह्यामुळे रमाकांत खलप यांना एक लाख सोळा हजारांनी धूळ चारण्यात श्रीपाद यशस्वी ठरले. पर्येत सहापट, वाळपईत तिप्पट, डिचोली आणि मयेत तिप्पट, साखळीत पाचपट मते श्रीपाद यांच्या पारड्यात पडली. सांताक्रुज आणि हळदोण्यातील ख्रिस्ती मतदारांनी मात्र काँग्रेसला एकगठ्ठा मतदान केलेले दिसले. बाबूश मोन्सेर्रात यांनी ताळगावमध्ये मात्र हे ध्रुवीकरण टाळले. कळंगुटमध्ये श्रीपाद यांच्या विरोधात कोणी काम केले हे आता पक्षाने शोधावे लागेल. खुद्द मांद्रे आणि पेडण्याने खलपांना पूर्णपणे नाकारलेले दिसले. म्हापशातही त्यांना पाठिंबा दिसला नाही. त्यामुळे मुळातच एकतर्फी असलेल्या ह्या लढतीत खलप यांच्या पारड्यात जी एक लाख चाळीस हजार मते पडली, ती नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गेलेल्या अल्पसंख्यकांच्या एकगठ्ठा मतांमुळे हे उघड आहे. काँग्रेसच्या संघटनात्मक कामगिरीचा हा परिणाम म्हणता येत नाही. पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यात जे आमदार कमी पडले, त्यांचे काय करायचे हे आता भाजपने जरूर ठरवावे. राज्य मंत्रिमंडळातही खांदेपालट आता अपरिहार्य ठरतो.