एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड

0
6

>> बैठकीत एकमताने निर्णय; एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली गतिमान; शनिवारी नव्या सरकारचा शपथविधी शक्य

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ला बहुमत मिळाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. या पार्श्वभूमीवर एनडीएने सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या शनिवार दि. 8 जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने एनडीएने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काल नवी दिल्ली झालेल्या बैठकीत मोदींची एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात आली. तत्पूर्वी, काल नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदींचा राजीनामा मंजूर केला असून, मोदी हे तूर्त काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत आणि इंडिया आघाडीला 233 जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. बहुमताच्या आकड्यापेक्षा (272) ही संख्या 32 ने कमी आहे. मात्र, एनडीएने 293 जागांसह बहुमताचा आकडा पार केला आहे. चंद्राबाबू नायडूंचा टीडीपी 16 जागांसह एनडीएमधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे आणि नितीश कुमार यांचा जेडीयू 12 जागांसह एनडीएमधील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. भाजपसाठी यावेळी दोन्ही पक्ष आवश्यक आहेत. त्यांच्याशिवाय भाजपला सरकार स्थापन करणे अवघड आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 7 आणि चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्ष (रामविलास गट) 5 जागा जिंकल्या आहेत. तेही सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावतील. अन्य छोट्या-मोठ्या घटक पक्षांना जवळपास 13 जागा मिळाल्या आहेत.

भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकत नसला, तरी एनडीएला बहुमत मिळाल्याने केंद्रात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आणि त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला. राष्ट्रपती मुर्मूंनी हा राजीनामा स्वीकारला असून, तूर्त मोदी देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून पदावर कायम राहणार आहेत. एनडीए बैठकीआधी लोकसभा भंग करण्याची औपचारिक माहिती देण्यासाठी पंतप्रधान मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले होते. पंतप्रधान मोदींनी राजीनामा दिल्यानंतर आणि मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा विसर्जित केली.

कसे असेल मोदी 3.0 सरकार?
2014 नंतर पहिल्यांदाच भाजप 272 च्या बहुमतापासून मागे पडले आहे. त्यामुळे यंदा नव्या सरकारचा चेहरामोहरा बदलू शकतो, अशी शक्यता राजकीय वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपला एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या घटक पक्षांना चांगली खाती द्यावी लागणार तर आहेच, शिवाय त्यांच्या काही मागण्या देखील मान्य कराव्या लागणार आहेत.
5 जून ते 9 जून राष्ट्रपती भवन सर्वसामान्यांसाठी बंद
नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याबाबत राष्ट्रपती भवनाने माहिती दिली आहे. राष्ट्रपती भवनने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाच्या तयारीमुळे राष्ट्रपती भवन (सर्किट-1) 5 ते 9 जूनपर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद राहील. त्यामुळे आता एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा या कालावधीतच पार पडेल, अशी दाट शक्यता आहे.

बैठकीला 16 पक्षांचे 21 नेते हजर
लोकसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या अनुषंगाने काल दुपारी 4 वाजता एनडीएची पहिली बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली. तासभर चाललेल्या बैठकीत मोदींची एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीला 16 पक्षांचे 21 नेते उपस्थित होते.

बैठकीला कोणते नेते होते हजर?
काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, टीडीपचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू, जेडीयूचे अध्यक्ष नीतीश कुमार, शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदे, जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी, लोजपचे चिराग पासवान, हम पक्षाचे जीतन राम मांझी, जनसेना पक्षाचे पवन कल्याण, प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस), अनुप्रिया पटेल, रालोदचे जयंत चौधरी, प्रमोद बोरो, अतुल बोरा, इंद्रा हैंग सुब्बा, सुदेश महतो, राजीव रंजन सिंह, संजय झा हे उपस्थित होते.

शनिवारी सायंकाळी शपथविधी शक्य
सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर शनिवार दि. 8 जून रोजी नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. हा शपथविधी कार्यक्रम संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान होऊ शकतो.

एनडीएची उद्या पुन्हा बैठक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएच्या खासदारांची शुक्रवारी 7 जूनला दुपारी 2.30 वाजता संसद भवनात बैठक होणार आहे. या बैठकीला एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध पक्षांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत ते राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे. राजनाथ सिंह, अमित शहा आणि जेपी नड्डा यांना सर्व मित्रपक्षांशी वन टू वन बोलण्याची आणि नवीन सरकारच्या स्वरूपावर चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.