कारखान्यांतच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारा; अन्यथा उद्योग बंद : मुख्यमंत्री

0
6

आपल्या कारखान्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प ज्या उद्योगांकडे नसेल, त्या उद्योगांना त्यांचे कारखाने बंद करावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल दिला.

उद्योगांचे आम्ही स्वागत करतो. मात्र ज्या उद्योगांमुळे आमच्या पर्यावरणावर घातक असा परिणाम होणार असेल, तर ते उद्योग बंद केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. उद्योगातील खराब पाणी प्रक्रियेसाठी सांतईनेज येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात नेऊ नये, असा आदेशही काल मुख्यमंत्र्यांनी दिला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा इशारा दिला. उद्योगांनी आपल्या खराब पाण्यावर आपल्या ईटीपीतच प्रक्रिया करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. उद्योगातील सांडपाणी 26 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सांतईनेज येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात नेऊन त्या प्रकल्पाची दुर्दशा करण्याचे दिवस आता संपले असे समजा, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. उद्योगातील सांडपाणी घेऊन येणाऱ्या टँकर्सना सांतइनेज येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात प्रवेश दिला जाणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गोवा सरकार जून ते ऑगस्ट या दरम्यान बांबूची सुमारे 1 लाख रोपटी विनामूल्य राज्यातील सर्व तालुक्यांत वितरित करणार असल्याचे काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मातीची धूप रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. खाजन शेतीतील बांध व मातीची धूप होत असलेल्या अन्य ठिकाणी ही रोपे लावण्यात यावीत, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

पाच वर्षांच्या काळात पूर्ण वाढ होणाऱ्या व्यावसायिक जातीच्या बांबूची रोपटी त्यासाठी वितरित करण्यात येणार आहेत. त्याशिवाय बांबू बोर्डातर्फे लोकांना सवलतीच्या दरातही बांबूची रोपे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्याशिवाय शेतकऱ्यांना काजूची रोपेही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
योग्य प्रकारे घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या पंचायतींना अतिरिक्त निधी तसेच हरित प्रमाणपत्रही देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पुढे दिली.