गोवा विधानसभा निवडणूक इंडिया एकत्र लढणार

0
5

>> गोव्यातील इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून स्पष्ट; ‘2027 मध्ये 30 पार’ची देखील घोषणा

लोकसभा निवडणुकीनिमित्त स्थापन झालेली ‘इंडिया’ आघाडी 2027 ची गोवा विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असून, ह्या निवडणुकीत ह्या आघाडीला किमान 30 जागा मिळतील, असा विश्वास इंडिया आघाडीच्या गोव्यातील नेत्यांनी काल व्यक्त केला.

काल घेतलेल्या पत्रकार परिषदेला गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अमित पालेकर, गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा व शिवसेना ठाकरे गटाचे प्रदेश अध्यक्ष जितेश कामत उपस्थित होते.
यावेळी युरी आलेमाव यांनी ‘2007 मध्ये 30 पार’ अशी घोषणाही दिली. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांत काँग्रेस पक्षाला 17 विधानसभा मतदारसंघात, तर उत्तर गोवा विधानसभा मतदारसंघात 13 ठिकाणी मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे 2027 सालची निवडणूक इंडिया आघाडीने एकजुटीने लढवली, तर आम्ही सहज 30 पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो, असे आलेमाव यांनी स्पष्ट केले. अमित पाटकर, अमित पालेकर, काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा आदींनीही तसेच मत यावेळी व्यक्त केले.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीला मिळालेला विजय हा आमचा विजय नसून, जनतेचा विजय असल्याच्यास भावनाही वरील नेत्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना इंडिया आघाडीच्या उमेदवारीवर दक्षिण गोव्यातून निवडून आलेले नेते विरियातो फर्नांडिस म्हणाले की, आपण लोकसभेत गोव्यातील जनतेच्या समस्या मांडणार आहेत. प्रामुख्याने कोळसा प्रदूषण, म्हादईचा मुद्दा, गोव्याच्या पर्यावरणासाठी घातक ठरणार असलेले केंद्र सरकारचे तीन मोठे प्रकल्प याबाबत आपण संसदेत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेला हजर असलेल्या अन्य नेत्यांमध्ये केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, एम. के. शेख, तुलियो डिसोझा, अविनाश भोसले आदींचाही समावेश होता.