तापमानाचे उच्चांक

0
36

दिल्लीच्या सीमेवरील मुंगेशपूर ह्या गावी देशातील आजवरचे सर्वोच्च 52.9 अंश तापमान बुधवारी नोंदवले गेल्याची बातमी आली आणि शतकातील हे सर्वोच्च तापमान ठरल्याने देश हादरला. मुंगेशपूरच्या वेधशाळेने नोंदवलेले हे तापमान सेन्सरच्या चुकीमुळे नोंदवले गेलेेले असू शकते, परंतु ज्या प्रकारे उत्तर भारत सध्या उष्णतेच्या लाटेमध्ये होरपळतो आहे, ते पाहिल्यास अशा प्रकारचे तापमानाचे उच्चांक गाठले जाणे अशक्यही नक्कीच नाही. दिल्लीतील सफदरजंगच्या वेधशाळेत त्या दिवशी 46.8 अंश तापमान नोंदवले गेले आहेच. राजस्थानमधील चुरूसारखे ठिकाण तापमानाचे उच्चांक गाठण्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु हीच स्थिती आता देशाच्या इतर भागांतही दिसू लागली आहे ही खरोखर चिंतेची बाब आहे. बिहारमध्ये शाळकरी मुलांना उष्णतेचा त्रास होऊन ती बेशुद्ध पडली. दिल्लीत एका माणसाचा ताप उष्माघातामुळे 107 वर जाऊन पोहोचला, अशा प्रकारच्या चित्रविचित्र बातम्या ह्या उष्णतेच्या लाटेची दाहकता दर्शवीत आहेत. गोव्यामध्येही गेल्या दोन महिन्यांमध्ये उच्चांकी तापमान काहीवेळा नोंदवले गेले. पणजी शहरानेदेखील 36 अंश तापमान पार केलेले या वर्षी एक दिवस पाहायला मिळाले होते. अवघ्या जगाला हवामानाचे हे लहरी खेळ गेली काही वर्षे सतत अनुभवावे लागत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग हा काही आता केवळ पंचतारांकित हॉटेलांमधील वातानुकूलित आलिशान सभागृहांतील दिमाखदार परिषदांमध्ये भरल्या पोटी चर्चिण्याचा विषय उरलेला नाही. ही किती गंभीर समस्या आहे आणि ती आपल्या दाराशी कशी येऊन ठेपलेली आहे ह्याचेच दर्शन ह्या बातम्या घडवीत आहेत. उष्माघात ही काही साधीसुदी गोष्ट नाही. उच्च तापमानाचा थेट परिणाम आपल्या शरीरातील ह्रदय, मूत्रपिंडादी अवयवांवर होत असतो. मानवाने निसर्गाशी जो खेळ मांडला, त्याचीच ही परिणती आहे आणि काय केले तर हे संकट थोपवता येईल ह्याची अनेकदा सतत चर्चाही होत असतेच, मात्र, त्यावर करायच्या उपाययोजनांबाबत जेवढे गांभीर्य असायला हवे ते कोणत्याही पातळीवर दिसत नाही ही शोकांतिका आहे. जागतिक हवामान परिषदांमधून प्रत्येक देश कर्ब उत्सर्जन कमी करण्याची बात करीत असतो. भारतानेही हा संकल्प केलेला आहे आणि त्यादिशेने प्रयत्नही सुरू आहेत. सौर ऊर्जेला चालना काय किंवा अपारंपरिक इंधनस्रोतांचा वापर काय, शून्य कर्ब उत्सर्जनाचे उद्दिष्ट समोर ठेवून सरकारी पातळीवर अनेक घोषणा होत असतात, परंतु एकीकडे हे संकल्प करीत असताना दुसरीकडे मात्र सर्रास वृक्षतोड, डोंगरकापणी, शेतजमिनींची, बागायतींची नासाडी करीत काँक्रिटची जंगले उभी केली जातच असतात. पाण्याच्या पारंपरिक स्रोतांकडे गेल्या अनेक वर्षांत जे अक्षम्य दुर्लक्ष झाले, त्याची परिणती म्हणून आज पाण्यासाठी प्रत्येक उन्हाळ्यात टँकरवर विसंबून राहायची पाळी शहरी नागरिकांवर येत असते. आता मोसमी पाऊस केरळमध्ये येऊन दाखल झाल्याची सुवार्ता आली आहे. एक जूनला अपेक्षित असणारा पाऊस तेथे दोन दिवस आधीच अवतरला असल्याने गोव्यातही चार जूनपूर्वीच तो दाखल होईल अशी आशा आहे. संपूर्ण देशभरात मोसमी पाऊस पोहोचायला साधारणतः आठ जुलै उजाडत असतो. चार महिने पावसाचे असतात, परंतु जलसंवर्धनाच्या बाबतीत, पाण्याच्या पुनर्भरणाच्या बाबतीत नुसत्या घोषणाच होत असतात. येत्या पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे, त्या दिवशीही भाषणांतून नेतेमंडळी घोषणांची खैरात करतील, परंतु प्रत्यक्ष जमिनीवर काय चित्र दिसते? शहरे स्मार्ट बनवण्याच्या नावाखाली झाडांचे असलेले आच्छादन बेफाटपणे कापून टाकले जाते, झाडीने भरलेले हिरवेगार डोंगरच्या डोंगर कापून तेथे महाप्रकल्प उभे केले जातात, विकासाच्या नावाखाली शेती बागायतींची वाताहत चालते, जल, जमीन, जीवन यांचा परस्परांशी असलेला संबंध लक्षात घेतलाच जात नाही. सुरू असते बेफाट ओरबाडणे. परिणाम शेवटी आपल्यालाच भोगावे लागत आहेत. काश्मीरसारख्या ठिकाणी आज थंडी पळाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पंचेचाळीस अंश तापमान आहे. बिहार 48 अंशांत होरपळतो आहे. जेथे ओळीने विदेशी दूतावास उभे आहेत, अशा दिल्लीतील चाणक्यपुरीसारख्या ठिकाणी टँकरच्या पाण्यासाठी स्थानिक गोरगरीब नागरिकांची भांडणे लागलेली पाहायला मिळत आहेत. आणि नेतेमंडळी मात्र निवडणुकीच्या धुमाळीत गुंतून पडलेली आहेत. ह्या निवडणुकीत हवामानविषयक प्रश्न चर्चेलाही आले नाहीत अशी तक्रार मध्यंतरी आली. जेथे कोणाला सोयरसुतकच नाही, तेथे असे प्रश्न प्राधान्यक्रमावर येणार तरी कसे? ग्लोबल वॉर्मिंगवरील उपाययोजा हा निव्वळ शिळोप्याच्या चर्चेचा विषय बनला आहे. तो जेव्हा प्रत्यक्ष कृतीत उतरेल, तेव्हाच ह्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागतील.