>> कन्याकुमारीत भगवती अम्मन देवीचे घेतले दर्शन
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार काल संपला हा प्रचार संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कन्याकुमारी येथे विवेकानंद रॉक मेमोरियल येथे 1 जूनपर्यंत ध्यानधारणा करण्यासाठी दाखल झाले. विवेकानंद रॉक मेमोरियलकडे जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी प्रथम शहरातील भगवती देवी अम्मन मंदिरात पूजा केली. दरम्यान, मोदींची ही ध्यानधारणा म्हणजे अप्रत्यक्षरित्या प्रचार ठरू शकतो, अशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आटोपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कन्याकुमारीला पोहोचले. येथे त्यांनी भगवती देवी अम्मन मंदिरात (कन्याकुमारी मंदिर) दर्शन आणि पूजा केली. यानंतर ते विवेकानंद रॉक मेमोरियल येथे दाखल झाले. तेथे त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्यावर पुष्पांजली वाहत अभिवादन केले. यानंतर पंतप्रधान मोदी हे काल सायंकाळपासून ध्यानधारणेला बसले. 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यान धारणा करतील. यानंतर ते दिल्लीला रवाना होऊ शकतात.
मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून त्यांच्या मुक्कामादरम्यान 2000 पोलीस तैनात राहणार असून, भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाचाही चोख बंदोबस्त असणार आहे. गुरुवार ते शनिवार या कालावधीत हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद राहणार असून खासगी बोटींना नेण्यास परवानगी दिली जाणार नाही.
शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपला
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमधील 57 जागांसाठीचा प्रचार गुरुवारी सायंकाळी संपला. सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे.