भरधाव वेग जीवावर बेतला; 19 वर्षीय युवक जागीच ठार

0
16

कुर्टी येथील उड्डाण पुलावर सुसाट वेगाने जाणाऱ्या केटीएम दुचाकीची धडक दुभाजकाला बसून झालेल्या अपघातात श्रावण हरी नाईक (19, रा. कुंडई) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी मित्राने खरेदी केलेली सेकंड हँड केटीएम दुचाकी घेऊन श्रावण नाईक या युवक उसगाव येथून माघारी कुंडई येथे जात होता, त्यावेळी हा अपघात घडला. फोंडा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला.

प्राप्त माहितीनुसार, जीए-07-एम-3299 क्रमांकाची ही केटीएम दुचाकी श्रावण याच्या मित्राने दोन दिवसांपूर्वी खरेदी केली होती. दुचाकी चालवण्याचे आकर्षण असलेल्या श्रावण नाईक याने शुक्रवारी सकाळी मित्राकडून जबरदस्तीने केटीएम दुचाकी घेतली, त्यावेळी मित्राने त्याला कार घेऊन जाण्याची विनंती केली होती; पण मित्राची विनंती डावलून केटीएम दुचाकी घेऊन निघाला. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास सुसाट वेगाने उड्डाण पुलावरून जात असताना नियंत्रण गेल्याने केटीएमची धडक दुभाजकाला बसली. यानंतर श्रावण नाईक खाली कोसळून त्याचे डोके वीज खांबाला धडकले, परिणामी त्याचा जागीच मृत्यू झाला. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला.

या अपघाताची माहिती मिळताच मृत पावलेल्या श्रावण नाईक याच्या कुटुंबीयांनी तसेच मित्रांनी उपजिल्हा इस्पितळात गर्दी केली. श्रावण नाईक याने हेल्मेट परिधान केले नसल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
दरम्यान, स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कुर्टी येथील उड्डाण पुलावर रात्रीच्यावेळी दुचाकींवरून स्टंट केले जात असून, अनेक युवक नंबर नसलेल्या आकर्षक दुचाक्या घेऊन उड्डाण पुलावर स्टंट करीत असतात.