साबांखाच्या कर्मचाऱ्यास मारहाण; संशयित अटकेत

0
14

शांतीनगर-फोंडा येथे पाण्याच्या टाकीजवळ ड्युटीवर असलेले प्रदीप उर्फ गोविंद विष्णू गावकर (वाडी-तळावली) या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी संशयिताच्या अटकेच्या मागणीसाठी बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी फोंडा पोलीस स्थानकावर धडक दिली. मारहाणीचा प्रकार सोमवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडला होता. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी संशयित नागेश जग्गनाथ नाईक (49, रा. शांतीनगर-फोंडा) याच्याविरोधात गुन्हा नोंद करून त्याला काल अटक केली. जखमीवर उपजिल्हा इस्पितळात उपचार करण्यात आले.

शांतीनगर फोंडा येथील बांधकाम खात्याच्या टाकीतून गेल्या 22 वर्षांपासून पाणी सोडणाऱ्या गोविंद गावकर या कर्मचाऱ्याला नागेश नाईक या स्थानिकाने मारहाण केली. सदर घटना घडल्यानंतर रात्री उशिरा फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दिली होती; मात्र आपण बांधकाम खात्याचा कर्मचारी असल्याचे पोलिसांना सांगितले नव्हते. मंगळवारी सकाळी बांधकाम खात्याच्या सुमारे 50 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी फोंडा पोलीस स्थानकात धडक देऊन संशयिताला अटक करण्याची मागणी केली. बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता यशवंत मापारी यांनी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर नागेश नाईक याला पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, संशयिताला अटक करावी, या मागणीसाठी बांधकाम खात्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पोलीस स्थानकात धडक दिल्याने अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहिला. त्यामुळे लोकांची काही प्रमाणात गैरसोय झाली. मात्र संशयिताला अटक केल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन पाणीपुरवठा सुरळीत केला.