दिल्लीतील धूळवड

0
15

न्यायालयाने अंतरिम जामिनावर मुक्त केलेले केजरीवाल दिल्ली आणि अन्यत्र निवडणूक प्रचारात सक्रिय होऊ पाहत असतानाच उद्भवलेल्या स्वाती मलिवाल प्रकरणाने ते आणि त्यांचा पक्षही अडचणीत आले आहेत. दुसरीकडे सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्या पक्षाचे नावही मद्यघोटाळ्याप्रकरणीच्या आरोपपत्रात समाविष्ट केले आहे. एकूणच केजरीवाल यांच्यापुढे नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. स्वाती मलिवाल यांच्या प्रकरणात खरे काय घडले हे अद्याप समोर आलेले नाही. भल्या सकाळी त्या केजरीवाल यांना भेटायला त्यांच्या घरी गेल्या. तेथे केजरीवाल यांच्या सहायकाशी त्यांचा खटका उडाला आणि आपल्याला मारहाण झाली, आपले कपडे फाडले गेले वगैरे आरोपांचा सपाटा मलिवाल यांनी लावला. दिल्लीत खुट्ट जरी झाले तरी तो राष्ट्रीय विषय बनवण्याच्या वृत्तवाहिन्यांच्या नेहमीच्या सवयीनुसार आज यच्चयावत वाहिन्यांवर तो एकच विषय अहोरात्र चर्चिला जातो आहे. मुळात स्वाती मलिवाल यांच्यावर आम आदमी पक्ष नाराज आहे कारण दिल्लीच्या महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि राज्यसभेचे खासदारपदही मलिवाल यांना आम आदमी पक्षाने दिले, परंतु अरविंद केजरीवाल यांना मद्यघोटाळ्यात अटक झाली, तेव्हा त्यांनी केजरीवाल यांच्या समर्थनार्थ त्याबाबत अवाक्षर काढले नव्हते. मौन बाळगणारे दुसरे नेते म्हणजे राघव चढ्ढा. ते आजारपणाच्या निमित्ताने अद्याप विदेशात आहेत. मलिवाल यांना पक्षाने राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला सांगितले होते व मद्यघोटाळ्याच्या प्रकरणात केजरीवालांची साथ देणाऱ्या मूळ काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांना ती जागा देण्याचा आपचा मनसुबा आहे असेही सांगितले जाते. कारण काही असो, मलिवाल जेव्हा केजरीवालांना भेटायला आल्या, तेव्हा केजरीवालांचे सहायक बिभवकुमार यांच्याशी त्यांची बाचाबाची झाली. तेथे प्रत्यक्ष काय घडले, खरोखरच मलिवाल यांना मारहाण झाली का, त्यांचे कपडे फाडले गेले का, पोलिसांनी ह्या प्रकरणात जो कलम 308 खाली गुन्हा नोंदवलेला आहे, तसा हा खरोखरच प्राणघातक हल्ला होता का हे अद्याप स्पष्ट नाही. सीसीटीव्ही फुटेजचे जे तुकडे आम आदमी पक्षाने देशासमोर ठेवले आहेत, त्यामध्ये मलिवाल यांचे कपडे सुस्थितीत दिसतात, त्यांच्या डोक्याला त्या म्हणतात तशी जखमही झालेली दिसत नाही. घटना घडली त्यानंतर मलिवाल यांनी मुख्यमंत्री निवासातूनच पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केले होते, त्यानंतर त्या पोलीस स्थानकावरही गेल्या, पण त्यांनी त्या दिवशी तक्रारच नोंदवली नाही. तक्रार नोंदवली गेली चार दिवसांनी गुरूवारी. त्यामुळे पोलिसांत वेळीच तक्रार नोंदवली गेली नसल्याने ह्या प्रकरणाची न्यायालयीन बाजूच कमकुवत झाली आहे. वेळीच तक्रार नोंदवली गेली असती तर पोलिसांनी मलिवाल यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली असती आणि त्यांना खरोखरच त्या म्हणतात तशा प्रकारे चेहऱ्यावर सात आठ थपडा लगावल्या गेल्या, पोटात लाथ हाणली गेली असा प्रकार झाला असेल तर ते वैद्यकीय तपासणीत सिद्ध झाले असते. तक्रार अठ्ठेचाळीस तासांनंतर दाखल झालेली असल्याने आता हे प्रकरण न्यायालयात किती टिकेल सांगणे कठीण आहे. खरोखरच केजरीवालांच्या दिवाणखान्यात नेमके काय घडले त्याचा संपूर्ण व्हिडिओ समोर आल्याखेरीज वस्तुस्थिती उघडकीस येणे शक्य नाही. त्या पुराव्याशी छेडछाड झालेली असू शकते. केजरीवाल यांचे सहाय्यक बिभवकुमार यांनीही मलिवालविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली आहे. दिल्लीचे त्रांगडे हे की तेथील मुख्यमंत्री जरी आम आदमी पक्षाचा असला तरी पोलिसांवर नियंत्रण केंद्र सरकारचे म्हणजेच भाजपचे आहे. केजरीवाल अंतरिम जामीन मिळाल्याने तुरुंगातून बाहेर आले. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन फायली हाताळण्यास मज्जाव करण्यात आलेला असला, तरी प्रचाराला मनाई नाही. त्यांना प्रचार करण्यास मज्जाव करण्याचा ईडीचा प्रयत्न न्यायालयाने धुडकावून लावलेला आहे. त्यामुळे केजरीवाल मोकळे आहेत. त्यामुळे आप विरुद्ध भाजप हा संघर्ष आधीच पराकोटीला जाऊन पोहोचलेल्या सध्याच्या परिस्थितीत मलिवाल प्रकरणात केजरीवाल यांना जास्तीत जास्त राजकीय नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला तर नवल नाही. परंतु खरोखरच मलिवाल यांच्याशी त्या म्हणतात तसे गैरवर्तन झाले असेल, तर आम आदमी पक्षाला हा राजकीय सूड म्हणून त्यावर पांघरूण घालता येणार नाही. दिल्लीची लोकसभा निवडणूक सहाव्या टप्प्यात म्हणजे येत्या 25 मे रोजी होणार आहे. आम आदमी पक्षाचे जिथे सरकार आहे, त्या पंजाबमधील सर्वच्या सर्व तेरा जागांची निवडणूक शेवटच्या टप्प्यात म्हणजे एक जून रोजी होणार आहे. त्यामुळेच सध्याच्या स्वाती मलिवाल प्रकरणाला मोठा राजकीय रंग चढला आहे हेच यातले वास्तव आहे.