दर्जा सुधारल्याने सरकारी शाळांच्या निकालाची टक्केवारी वाढली : मुख्यमंत्री

0
25

ाज्यातील सरकारी विद्यालयांचा दर्जा सुधारण्यात आल्याने सरकारी विद्यालयांच्या दहावीच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. राज्यातील 78 पैकी 41 सरकारी विद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला. सरकारी विद्यालयातील शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि अद्ययावत साधन सुविधांमुळे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली आहे. आता, पालकांनी आपल्या पाल्यांना सरकारी विद्यालयातून शिक्षण देण्यास सुरुवात केली पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला. पर्वरी येथे काल मंत्रालयात शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत दहावी परीक्षेच्या निकालाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील सरकारी विद्यालयांची कामगिरी उल्लेखनीय आहे. ग्रामीण भागात सरकारी विद्यालये कार्यरत आहेत. या विद्यालयातून मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. सरकारी विद्यालयांत शिक्षण घेणारी मुले वेगळी खासगी शिकवणी घेऊ शकत नाहीत, तर शिक्षकच खास वर्ग घेऊन मुलांना मार्गदर्शन करतात. सरकारी विद्यालयांत नववीच्या वर्गात कुणालाही नापास केले जात नाही. मात्र अनुदानित विद्यालयांत उत्तम निकालासाठी नववीत मुलांना नापास केले जाते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सरकारच्या पहिली ते चौथी या प्राथमिक विद्यालयासाठी इंग्रजी विषयाच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील पाच वर्षांपासून सरकारी विद्यालयामध्ये अत्याधुनिक साधनसुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. त्यात स्मार्ट क्लासरूम, वाचनालय, प्रगत प्रयोगशाळा, वाहतूक सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी आदींचा समावेश आहे. त्यामुळे सरकारी विद्यालयाच्या निकालांमध्ये सुधारणा होत आहे. राज्यातील मुलांचे उज्ज्वल शैक्षणिक भविष्य घडवण्यासाठी पायाभूत सुविधा आणि मानव संसाधन या दोन्हींवर भर कायम ठेवला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दहावीनंतर शिक्षणासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मुलांनी उज्वल भविष्याचा विचार करून करिअरसाठी अभ्यासक्रम निवडावा, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

सरकारी शाळांतील शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जात आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी विविध नामवंत संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. सरकारी विद्यालयातील साधनसुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे, असे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.

13 शाळांचा 100 टक्के निकाल हुकला
13 सरकारी शाळांत प्रत्येकी एका विद्यार्थ्याला एटीकेटी मिळाल्याने या शाळांचा 100 टक्के निकाल लागला नाही. पुढील परीक्षेत ते विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास 100 टक्के निकाल देणाऱ्या सरकारी शाळांच्या संख्येत वाढ होऊ शकते, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले. यावेळी शिक्षण खात्याच्या अधिकारी मेघना शेटगावकर, शंभू घाडी, सिंधू प्रभुदेसाई, पॉल फर्नांडिस उपस्थित होते.

सर्वांना अकरावीत प्रवेश
राज्यातील दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश मिळवून दिला जाणार आहे. राज्यात सरकारची 9 उच्च माध्यमिक विद्यालये असून, 91 अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. तसेच, 4 विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालये आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.