जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन

0
70

>> मन की बातमध्ये पंतप्रधान मोदी

देशात जीएसटीची अंमलबजावणी झाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमात बोलताना केला. या नव्या करपद्धतीच्या कार्यवाहीत देशातील विविध राज्येही भागीदार असल्याने हा निर्णय म्हणजे सहकारी संघराज्याचे एक उत्तम उदाहरण ठरले असल्याचे ते म्हणाले.
आपल्या खंडप्राय देशातील कोट्यवधी नागरिकांचा सहभाग असलेल्या या पद्धतीचे स्थित्यंतर सुरळीतपणे झाल्याने ही एक ऐतिहासिक घटना असून जगभरातील विद्यापीठांसाठी तो एक संशोधनाचा विषय ठरू शकतो याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.
जीएसटीची अंमलबजावणी करतेवेळी आपल्या सरकारने या निर्णयामुळे गरीबाच्या थाळीवर याचा बोजा पडता कामा नये, याला प्राधान्य दिले असे त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या विविध भागांमध्ये निर्माण झालेली पूरस्थिती व अन्य विषयांवरही त्यांनी भाष्य केले. नुकतीच महिला विश्‍व चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी अभिनंदन केले. गरीब लोकांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक वस्तू नागरिकांनी उत्सवांमध्ये खरेदी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
जीएसटी पद्धती म्हणजे केवळ कर पद्धतीच नसून त्याद्वारे एका नव्या संस्कृतीचा उदय झाला असल्याचे त्यांनी या अर्ध्या तासाच्या भाषणात सांगितले. या योजनेचा अंमलबजावणीस एक महिना झाला असून गरीबांच्या गरजेच्या वस्तूंचे दर कसे कमी झाले आहेत हे सांगणारे पत्र कुणी मला पाठवल्यास मी समाधानी होईन, असे ते म्हणाले.
जीएसटीला आपण ‘गुड अँड सिम्पल टॅक्स’ असे म्हणतो. अल्पावधीत या पद्धतीने आमच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम घडवला आहे, असे त्यांनी सांगितले.