मतपेटीत लपलंय काय?

0
15
  • गुरुदास सावळ

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस अजून 23 दिवस आहेत. गोव्यात 76.99 टक्के इतके विक्रमी मतदान झाल्याने ‘भाजपा’ तसेच ‘इंडिया’ आघाडीवाले आणि ‘आरजी’ही खूश आहे. ही वाढीव टक्केवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची किमया आहे असे भाजपा नेत्यांना वाटते, तर ही सत्ताधारी पक्षाविरोधात जनतेची तिडीक आहे असा ‘इंडिया’ आघाडीवाल्यांचा दावा आहे. गोमंतकीय मतदार सत्ताधारी भाजपा आणि विरोधी आघाडीला कंटाळले आहेत व त्यामुळे त्यांनी ‘आरजी’ला एकगठ्ठा मते दिली आहेत, हा मनोज परब आणि इतर क्रांतिकारकांचा दावा आहे. कुणी काही म्हणत असले तरी येत्या 4 जूनलाच खरी बाजी कुणी मारली हे कळणार आहे.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होण्यास अजून 23 दिवस असले तरी गोव्यातील दोन्ही जागा भाजपलाच मिळणार याबद्दल खात्री असल्याने मतदानाच्या दिवशीच भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. गोव्यात 76.99 टक्के इतके विक्रमी मतदान झाल्याने ‘भाजपा’ तसेच ‘इंडिया’ आघाडीवाले आणि ‘आरजी’वालेही खूश आहेत. ही वाढीव टक्केवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची किमया आहे असे भाजपा नेत्यांना वाटते, तर ही सत्ताधारी पक्षाविरोधात जनतेची तिडीक आहे असा ‘इंडिया’ आघाडीवाल्यांचा दावा आहे. गोमंतकीय मतदार सत्ताधारी भाजपा आणि विरोधी आघाडीला कंटाळले आहेत व त्यामुळे त्यांनी ‘आरजी’ला एकगठ्ठा मते दिली आहेत, हा मनोज परब आणि इतर क्रांतिकारकांचा दावा आहे.

निवडणूक प्रचार व जनसंपर्क मोहीम विचारात घेतल्यास भाजपा पहिल्या दिवसापासून आघाडीवर होता हे मान्य करावेच लागेल. बूथ कमिटी, पन्ना प्रमुख, गट समिती आदी विविध स्तरांवर भाजपाचे लोक काम करत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपा गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे हे दोन्ही नेते 24 तास काम करत होते. प्रत्येक आमदार व त्यांचे सहकारी यांना लक्ष्य ठरवून दिले होते. पन्ना प्रमुख म्हणून नियुक्त केलेल्या कार्यकर्त्याला मतदारयादीचे एक पान दिले होते. या पानावर नावे असलेल्या सर्व मतदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी या पन्ना प्रमुखाची होती. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आदी राष्ट्रीय नेत्यांनी गोव्यात प्रचाराची धुरा समर्थपणे पेलली.

काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप व कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या दिमतीला गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर व विरोधी पक्षनेते युरी आलेमांव हे दोघेच होते. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी एकही राष्ट्रीय नेता गोव्यात आला नाही. शशी थरूर हे राष्ट्रीय वलय असलेले एकमेव नेते सक्रिय होते. ‘आम आदमी पार्टी’चे अध्यक्ष अमित पालेकर यांनी काँग्रेस उमेदवारांचा सक्रिय प्रचार केला; मात्र व्हिटॅमिन ‘एम’ नसल्याने प्रचारसभा घेता आल्या नाहीत, असे काँग्रेसचे नेते सांगत होते.

दक्षिण गोव्यातील काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी संपूर्ण प्रचाराची धुरा स्वबळावरच सांभाळून घेतली. गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी त्यांना चांगले सहकार्य केले, पण राष्ट्रीय पातळीवरील कोणी नेता धावून आला नाही. ही पोकळी भरून काढण्यासाठी ‘यूजीडीपी’चे नेते राधाराव ग्रासियस स्वतःहून पुढे आले. सासष्टी तालुक्यातील कोकणीतून त्यांनी केलेली मुद्देसूद भाषणे बरीच प्रभावशाली ह़ोती.

मडगाव वगळता सासष्टी तालुक्यातील ग्रामीण भागात अल्पसंख्याक लोक मोठ्या प्रमाणात आहेत. या लोकांचे मतपरिवर्तन करण्याची कला राधाराव यांना चांगलीच अवगत आहे. या कलेच्या जोरावर ते पोटनिवडणूक जिंकले होते. सर्वसामान्य माणसाला, विशेषतः अल्पसंख्याक लोकांना भुरळ पाडणारी भाषणे ऐकून थोड्याफार प्रमाणात तरी विरियातो यांची मते वाढली असणार.

मडगाव येथे राष्ट्रीय नेत्यांची एक जाहीर सभा व्हावी अशी खुद्द विरियातो आणि काँग्रेस श्रेष्ठींचीही इच्छा होती. पण अशी सभा आयोजित करण्यासाठी लागणारा पैसा कोणी खर्च करावा यावर उपाय न निघाल्याने अखेर सभा झालीच नाही. विरियातो यांनी मुरगाव व सासष्टी तालुक्यांवरच लक्ष केंद्रित केले. त्यामुळे फोंडा, सांगे, काणकोण या तीन तालुक्यांत ते पोचलेच नाहीत.

काणकोण तालुक्यात सभापती रमेश तवडकर यांनी आपल्या प्रभावशाली कार्याने जनमानसावर ताबा मिळवला आहे. त्यामुळे काणकोण तालुक्यात आता भाजपाविरोधाला फारशी धार राहिलेली नाही. विरियातो फर्नांडिस यांना सासष्टी तालुक्यात जी थोडीफार आघाडी मिळाली असेल ती फोंडा, सांगे व काणकोण तालुक्यांतून भरून निघेल. मडगाव, नावेली आणि विजय सरदेसाई यांच्या फातोर्डा या तिन्ही मतदारसंघांतच भाजपा उमेदवाराला किमान 25 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे, असा दावा भाजपवाले करत आहेत. या सगळ्या मतांची गोळा बेरीज करता पल्लवी धेंपो किमान 50 हजारांच्या मताधिक्याने विजयी होतील असा केवळ विश्वासच नव्हे तर आत्मविश्वास भाजपा नेत्यांना वाटत आहे.
उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांना सत्तरी तालुक्यात मोठी आघाडी मिळवून देण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे व त्यांची पत्नी डॉ. दिव्या राणे यांनी कंबर कसली होती. डॉ. दिव्या राणे यांच्या पर्ये मतदारसंघात तब्बल 87, तर वाळपई मतदारसंघात 82 टक्के मतदान झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात वाळपईपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 86 टक्के मतदान झाले. मये मतदारसंघात 83 टक्के मतदान झाले. डिचोली मतदारसंघातही 82 टक्के मतदान झाले. मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर मगो पक्षाचे असले तरी त्यांनी भाजपा आमदारापेक्षा अधिक जोमाने भाजपासाठी काम केले आहे. भाजपाने तिकीट नाकारले म्हणून बंडखोरी केलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही आपले जुने मित्र व सहकारी श्रीपाद नाईक यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मांद्य्राचे भावी आमदार म्हणून ओळखले जाणारे सचिन परब यांनी मतदानाला काही दिवस शिल्लक असताना भाजपात प्रवेश करून भाजपा उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. हे सचिन परब म्हणजे माजी मंत्री सौ. संगीता परब यांचे सुपुत्र. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सचिन परब हे काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप यांचे सुपुत्र निखिल खलप यांचे साडू होत.

आगामी विधानसभा निवडणुकीत सचिन परब यांना तिकीट मिळाली असती, पण त्यांनी पक्षांतर केल्याने ही संधी हातची गेली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सचिन परब यांना तिकीट मिळाली असती पण ऐनवेळी ही जागा गोवा फारवर्डला द्यावी लागली व सचिन यांची संधी हुकली. त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाची तिकीट मिळाली तरी पार्सेकर, दयानंद सोपटे आदी नेत्यांचा पाठिंबा मिळणे कठीणच आहे. त्यामुळे भाजपाची तिकीट मिळाली तरी विजय होईलच याची खात्री देता येणार नाही.

एवढ्या साऱ्या लोकांचा पाठिंबा असूनही मांद्रे मतदारसंघात मतदान अपेक्षेप्रमाणे झाले नाही. मांद्रे मतदारसंघ हा तर काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांची जन्म आणि कर्मभूमी. मांद्रे मतदारसंघाने खलप यांना तब्बल 5 वेळा विधानसभेवर निवडून दिले. अशा या मतदारसंघात खलप यांना मोठ्या प्रमाणात मतदान होणे अपेक्षित होते, पण मतदानाचे अल्प प्रमाण पाहता हे कसे घडले तेच कळत नाही.

रमाकांत खलप हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. विचारवंत, बुद्धिमान म्हणून त्यांची ख्याती आहे. मात्र मूळ काँग्रेसवाले त्यांच्याकडे नेहमीच संशयाने पाहात आले आहेत. विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा निवडणूक असो- मूळ काँग्रेसवाल्यांनी खलप यांच्यासाठी कधीच प्रामाणिकपणे काम केल्याचे दिसले नाही. एकदा तर खुद्द काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी खलप यांना विधानसभा निवडणुकीत पाडले होते. आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी तर त्यांना वाऱ्यावर सोडून दिले होते.

सत्ताधारी भाजपाच्या प्रभावी प्रचारापुढे काँग्रेसचा प्रचार निष्प्रभ ठरला. ‘आरजी’ला तरुणांकडून अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळाला हे आता स्पष्ट झाले आहे. ‘आरजी’ला जेवढी जास्त मते तेवढी काँग्रेसची मते कमी हे उघड गणित आहे.
काँग्रेस नेत्यांनी पराभव मान्य केला असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीरपणे केला आहे. अर्थात, होय मी पराभूत झालो असे कोणताही नेता उघडपणे सांगणार किंवा मान्य करणार नाही. मतदान यंत्र उघडल्यावर कोण जिंकले आणि कोण पडले हे जाहीर होईलच.

भाजपाची एकूणच तयारी, पद्धतशीर प्रचार यंत्रणा, तळागाळातील कार्यकर्त्यांची तळमळ, डबल इंजिन असलेले राज्य व केंद्रातील सरकारे, मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली साधनसंपत्ती या सगळ्या गोष्टींमुळे गोव्यात भाजपाच जिंकणार हे सुरुवातीपासून दिसत होते. काँग्रेस उमेदवारांना आधार वाटत होता तो अल्पसंख्याक मतदारांचा. पण या आघाडीवरही भाजपाने मजल मारलेली दिसते.

मडगाव येथील मोतीडोंगर परिसरातील अल्पसंख्याकांची मते भाजपा उमेदवाराला मिळवून देण्याची किमया दिगंबर कामत यांनी घडवून आणली. विजय सरदेसाई यांच्या अनेक मित्रांनी भाजपा उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांना निवडून आणण्यास हातभार लावला आहे. धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांच्या फुटबॉलप्रेमाचा भाजपा उमेदवाराला बराच लाभ झाला आहे असा अंदाज आहे. हा अंदाज किती खरा ठरतो हे 4 जूनलाच कळू शकेल.
लोकसभा निवडणुकीनंतर गोव्यात राजकीय आघाडीवर मोठी उलथापालथ होईल अशी जोरदार चर्चा सत्तरी तालुक्यात चालू आहे. ही उलथापालथ म्हणजे नक्की काय घडणार हे कोणालाच माहीत नाही.
मांद्य्राचे मगो आमदार जीत आरोलकर हे लोकसभा निवडणुकीनंतर मंत्री बनणार अशी जोरदार चर्चा मांद्रे मतदारसंघात चालू होती. ही चर्चा खरी ठरू नये म्हणून मांद्रे मतदारसंघात मुद्दामच मतदान कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकांनी मतदान करू नये असे स्पष्ट आदेश वरिष्ठांनी दिले होते असे समजते.

मडगाव, नावेली आणि फातोर्डा या तिन्ही मतदारसंघांतील भरघोस मतदानाचे श्रेय दिगंबर कामत यांना जाते हे श्रेष्ठींनी मान्य केले आहे. त्यामुळे आता तब्बल दोन वर्षांनी भरपाई केली जाईल असे दिसते.
जीत आरोलकर यांना मंत्रिपद मिळणार तर मलाही मंत्रिपद मिळाले पाहिजे असा आग्रह संकल्प आमोणकर यांनी धरला आहे. त्यांची ही मागणी मान्य केली तर मोठ्या प्रमाणात उलथापालथ करावी लागेल. या सगळ्या उलथापालथीत कोणाकोणाचा बळी जातो, कोणाकोणाला बढती मिळते हे पाहाणे बरेच मजेशीर ठरणार.