>> आरजीचे प्रमुख मनोज परब यांचा पत्रकार परिषदेत आरोप
भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांकडून निवडणुकीवेळी धर्माचे राजकारण केले जाते. धर्माच्या नावावरील राजकारणामुळे गोव्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास एक दिवस गोव्यात धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी भीती रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख तथा उत्तर गोव्याचे उमेदवार तुकाराम ऊर्फ मनोज परब यांनी आरजीपीच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत मतदारांनी आरजीपी या प्रादेशिक पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. भाजपप्रमाणे आम्हांला तर्कवितर्क लढवण्यात कोणताही रस नाही. येत्या 4 जून रोजी मतमोजणीनंतर आरजीपीला किती मतांची आघाडी मिळाली, हेही स्पष्ट होईल असेही आरजीपीचे तुकाराम परब यांनी सांगितले.
भाजपने उत्तर गोव्यात एक लाख आणि दक्षिण गोव्यात 60 हजारांची आघाडी मिळेल, असा दावा केला आहे. त्यांना ही आकडेवारी कशी कळली ते समजत नाही, असेही परब यांनी सांगितले.
राज्यातील इतर राजकीय पक्षांप्रमाणे लोकसभा निवडणुकीत आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. निवडणूक लढवण्यासाठी कोणत्याही बिल्डर लॉबीकडून, कॅसिनोमधून आम्ही पैसे घेतलेले नाहीत. केवळ गोवेकरांनी आपल्या घामाचे आणि कष्टाचे पैसे देणग्या म्हणून दिले. त्यावर निवडणूक लढवली आहे, असेही परब यांनी सांगितले. यावेळी आरजीपीचे सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर, दक्षिण गोवा उमेदवार रुबर्ट परेरा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा पंचायत निवडणुकीत आरजीपी सर्व जागा लढणार
आरजीपी 2025 मध्ये होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत उतरणार आहे. जिल्हा पंचायतीच्या 50 मतदारसंघात आरजीपी उमेदवार उभे करणार आहे. जिल्हा पंचायतीसाठी उमेदवारांचा शोध घेतला जाणार आहे, असे आरजीपीचे खजिनदार अजय खोलकर यांनी सांगितले.