>> मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांची पत्रकार परिषदेत माहिती
>> मतदानात महिलांची टक्केवारी पुरुषांपेक्षा जास्त
>> उत्तर गोव्यात 77.69, दक्षिणेत 74.47 टक्के मतदान
राज्यात लोकसभा निवडणुकीत 76.06 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. उत्तर गोवा मतदारसंघात 77.69 टक्के आणि दक्षिण गोवा मतदारसंघात 74.47 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. राज्यात मतदान करणाऱ्या महिलांची टक्केवारी पुरुषांपेक्षा जास्त आहे. राज्यातील 11 लाख 79 हजार 344 मतदारांपैकी 8 लाख 96 हजार 958 मतदारांनी मतदान केले. त्यात पुरुष 4 लाख 31 हजार 087 आणि महिला 4 लाख 65 हजार 862 मतदारांचा समावेश आहे. तसेच इतर 9 मतदारांचा समावेश आहे. राज्यातील मतदानाच्या टक्केवारीमध्ये टपाल मतांचा समावेश करण्यात आलेला नाही. टपाल मतांचा समावेश केल्यानंतर राज्यातील एकूण मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणार आहे. राज्यातील सुमारे 11 हजार 115 मतदारांनी टपाल मतदान केले आहे. वर्ष 2019 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा आत्ताच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जास्त मतदानाची नोंद झाली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा (आयएएस) यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणुकीच्या काळात नागरिकांकडून 190 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात आचारसंहिता भंगाच्या 38 तक्रारींचा समावेश आहे. आचारसंहिता भंगाच्या 36 तक्रारी निकालात काढण्यात आल्या आहेत. दोन तक्रारींवर चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक मतदानाच्या काळात विविध इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये बिघाडाच्या 55 घटनाची नोंद झाली, असेही वर्मा यांनी सांगितले.
17.82 कोटींचा ऐवज जप्त
राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आल्यानंतर निवडणूक मतदानापर्यंतच्या काळात सुमारे 17 कोटी 82 लाखांचा विविध प्रकारचा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्यात रोख रक्कम, मद्य, अमली पदार्थ व इतर वस्तूंचा समावेश आहे. 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 40 टक्के आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 55 टक्के जास्त ऐवज हस्तगत करण्यात आला आहे, असेही सीईओ रमेश वर्मा यांनी सांगितले.
फातोर्डा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर एका महिला मतदाराने मतदान करताना मोबाईलवर घेतलेल्या छायाचित्र प्रकरणी संबंधिताकडून अहवाल मागविण्यात आला आहे, असे सीईओ रमेश वर्मा यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.
नाव गायबची तक्रार
मतदार यादीतून नाव गायब प्रकरणी एक तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रारदार हा मतदार मूळचा परराज्यातील रहिवासी असून येथे मतदार म्हणून नोंदणी केली होती. निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अद्ययावत केल्यानंतर मतदारांना आपल्या नावाची तपासणी करण्याचे आवाहन केले जाते. आणखी काही जणांची नावे गायब झालेली असू शकतात. परंतु याबाबत तक्रार दाखल झालेली नाही, असेही सीईओ रमेश वर्मा यांनी सांगितले.
दक्षिणेतून सांगेत सर्वाधिक मतदान
दक्षिण गोवा मतदारसंघात 4 लाख 45 हजार 916 मतदारांनी मतदान केले. त्यात पुरुष 2 लाख 10 हजार 017 आणि महिला 2 लाख 35 हजार 892 मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात सांगे येथे सर्वाधिक 82.20 टक्के आणि वास्को येथे सर्वांत कमी 68.42 टक्के मतदान झाले. फोंडा येथे 75.66 टक्के, शिरोडा येथे 78.17 टक्के, मडकई येथे 78.16 टक्के, मुरगाव येथे 74.37 टक्के, दाबोळी येथेे 72.65 टक्के, कुठ्ठाळी येथे 72.16 टक्के, नुवे 70.73 टक्के, कुडतरी 71.52 टक्के, फातोर्डा येथे 73.95 टक्के, मडगाव येथे 73.68 टक्के, बाणावली येथे 68.49 टक्के, नावेली येथे 71.53 टक्के, कुंकळ्ळी येथे 72.52 टक्के, वेळ्ळी येथे 69.46 टक्के, केपे 78.51 टक्के, कुडचडे 77.57 टक्के, सावर्डे 81.94 टक्के आणि काणकोण येथे 78.69 टक्के मतदान झाले.
उत्तर गोव्यातून पणजीत सर्वात कमी मतदान
उत्तर गोवा मतदारसंघात एकूण 4 लाख 51 हजार 042 मतदारांनी मतदान केले. त्यात पुरुष 2 लाख 21 हजार 070 आणि महिला 2 लाख 29 हजार 970 मतदारांचा समावेश आहे. पर्ये विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 88.62 टक्के मतदानाची नोंद झाली. तर, सर्वांत कमी पणजीमध्ये 68.26 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी विधानसभा मतदारसंघात 87.54 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. वाळपईमध्ये 84.53 टक्के, डिचोली येथे 83.36 टक्के, मये मध्ये 82.93 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
प्रियोळ मतदारसंघात 79.87 टक्के, कुंभारजुवा 74.10 टक्के, सांतआंद्रे 70.17 टक्के, सांताक्रुझ 72.61 टक्के, ताळगाव 72.61 टक्के, मांद्रे 79.07 टक्के, पेडणे 77.61 टक्के, थिवी 76.30 टक्के, म्हापसा 75.05 टक्के, शिवोली 76.70 टक्के, साळगाव 74.91 टक्के, कळंगुट 74.95 टक्के, पर्वरी 73.74 टक्के, हळदोणा 74.94 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.