खोर्ली म्हापसा शॉर्टसर्कि टचा 20 घरांना फटका

0
5

>> इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक, 10 लाखांचे नुकसान

समतानगर खोर्ली म्हापसा येथे काल सोमवारी भरदुपारी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान विजेच्या तारांवर माडाचे झावळ पडल्यामुळे शॉर्ट सर्किट झाले. यामुळे या परिसरात असलेल्या 20 घरांमधील लोकांचे दूरदर्शन संच, फ्रिज, पंखे, एसी तसेच मिक्सर व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले.
येथील संजू धारगळकर, सागर गावस, सुरज तेली, मोहन माजिक, गीता आमोणकर, संजय आमोणकर, संजिता नागवेकर, सत्यम तिवरेकर, विश्वास पेडणेकर, विजया मळगावकर, सुरेश कुंभार, मंगल कुंभार, सागर कुंभार, रामकृष्ण फडते, मनोज लाड, बाळकृष्ण गावस, प्रकाश गावस, दिलीप गावस व इतरांच्या घरातील दूरदर्शन संच, फ्रिज, पंखे या शॉर्टसर्किटमुळे जळाले. त्यामुळे त्यांचे सुमारे10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सदरच्या वीजवाहिनीवर झावळ पडल्यामुळे शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे येथील घरांतील इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये जोराचा आवाज झाला आणि संपूर्ण वस्तू खराब झाल्या. या घटनेची माहिती म्हापसा वीज कार्यालयाला देताच वीज कार्यालयाचे सुमारे 15 कर्मचारी घटनास्थळी आले व त्यांनी ट्रान्सफॉर्मर बंद केले व पूर्ववत वीज सुरू केली. त्यामुळे लोकांची होणारी गैरसोय दूर केली.
यावेळी म्हापसा वीज कार्यालयाचे अभियंते सावियो फर्नांडिस यांना विचारले असता त्यांनी या ठिकाणची घरे एकमेकाला लागूनच आहेत. त्याचप्रमाणे या लोकांनी माड, आंब्यांची व फणसाची झाडे लावलेली आहेत. वारंवार या माडाची झावळे पडतात आणि शॉर्टसर्किट होत असते. या लोकांना अनेक वेळा सांगूनही त्यांच्याकडून म्हणावे तसेच सहकार्य मिळत नसल्याची माहिती दिली.
दरम्यान, येथील एक नागरिक रुपेश हरमलकर यांनी या ठिकाणी एक माड विजेच्या खांबाला टेकून आहे. परंतु या मालकाला सांगूनही तो काढत नसल्याची माहिती दिली.