80 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान अपेक्षित : आयोग

0
10

>> उद्या मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचे मतदारांना आवाहन

मंगळवार दि. 7 मे रोजी राज्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची सगळी तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत 80 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान अपेक्षित असून, मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा (आयएएस) यांनी उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांसह पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केले.

मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान घेतले जाईल. राज्यभरातील एकूण 1725 मतदान केंद्रांवरुन मतदान होणार आहे. त्यापैकी 225 मतदान केंद्रे ही आदर्श मतदान केंद्रे असतील. 14 मतदान केंद्रे ही ‘पिंक’ असतील व तेथील सर्व कर्मचारी ह्या महिला असतील. 8 मतदान केंद्रांवरील सर्व कर्मचारी हे दिव्यांग असतील. त्याशिवाय अन्य 88 मतदान केंद्रे ही पर्यावरणीयदृष्ट्या अनुकूल अशी मतदान केंद्रे असतील. 1725 मतदान केंद्रापैकी 229 मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक अशा सगळ्या मूलभूत अशा गोष्टी असतील. 496 मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठीचा रॅम्प वे, लिंबू पाणी, फळांचा रस व अन्य प्रकारची पेये सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदारांना उपलब्ध करुन देण्यात येतील, असे रमेश वर्मा यांनी सांगितले.

आदर्श मतदान केंद्रांवर वैद्यकीय पथकांसह वैद्यकीय सुविधा, वैद्यकीय औषधपेटी असेल. तसेच काही ठिकाणी वैद्यकीय शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे, असे वर्मा यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय वृक्षारोपणाचा कार्यक्रमही संपन्न होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गिते यावेळी बोलताना म्हणाल्या की, सकाळी 7 वाजता मतदान सुरू होईल आणि ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू राहील. उत्तर गोवा मतदारसंघात एकूण 863 मतदान केंद्रे असतील. मतदानासाठी येणाऱ्या लोकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी सर्व मतदान केंद्रांवर कापडी मंडप उभारण्यात येतील. उत्तर गोव्यात 43 आदर्श मतदान केंद्रे असतील.

दक्षिण्ा गोव्याचे जिल्हाधिकारी आश्विन चंद्रा हे माहिती देताना म्हणाले की, दक्षिण गोवा मतदारसंघात 862 मतदान केंद्रे आहेत. यापैकी 40 केंद्रे ही पर्यावरणीयदृष्टया अनुकूल, तर 44 केंद्रे ही आदर्श मतदान केंद्रे आहेत. चार केंद्रांवर वैद्यकीय शिबिराची सोय असेल. दक्षिण गोव्यात काणकोण येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या महामार्गावर निवडणुकीनिमित्त झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच वार्का येथेही महामार्गावर झाडे लावण्यात येणार आहेत. त्याशिवाय उत्तर गोव्यातील महामार्गावरही झाडे लावण्यात येताल. तसेच ज्या ज्या मतदान केंद्रावर झाडे लावण्यासाठी जागा उपलब्ध असेल, त्या मतदान केंद्रावर प्रत्येकी पाच झाडे लावण्यात येतील. ज्या मतदान केंद्रावर झाडे लावण्यात जागा नसेल, त्या केंद्राच्या जवळपास परिसरात झाडे लावण्यात येतील.

निवडणुकीसाठीची सगळी तयारी पूर्ण : रमेश वर्मा

आम्ही निवडणुकीसाठीची सगळी तयारी पूर्ण केली असून, मतदानाच्या दिवसासाठी सज्ज झालो आहोत. आता लोकांनी मोठ्या संख्येने 7 मे रोजी मतदान केंद्रांवर येऊन मतदान करावे, असे आवाहन रमेश वर्मा यांनी यावेळी केले.
ज्या मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसेल, त्यांना विविध 12 ओळखपत्रांपैकी कुठलेही एक ओळखपत्र दाखवता येईल, अशी माहितीही रमेश वर्मा यांनी दिली.

मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था : ओमवीर सिंग

7 मे रोजीची लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात आणि योग्य प्रकारे पार पडावी यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी यावेळी दिली. मतदारांना मोबाईल फोनसह कुठल्याच प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य मतदान केंद्रात नेता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रचारतोफा थंडावल्या

राज्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठीचा निवडणूक प्रचार काल सायंकाळी 5 वाजता संपुष्टात आला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. कोपरा बैठका, रॅली आणि भव्य सभा यातून उमेदवारांनी प्रचार मोहीम राबवली. आता मतदार कोणाला कौल देतात ते पाहावे लागणार आहे.

मतदान यंत्रे कुठे ठेवणार?

उत्तर गोव्यातील मतदान यंत्रे मतदानानंतर आल्तिनो येथील पॉलिटेक्निक केंद्रात ठेवण्यात येतील, तर दक्षिण गोव्यातील मतदान यंत्रे मतदानानंतर मडगाव येथील दामोदर महाविद्यालय इमारतीत ठेवण्यात येतील.