लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला विजयी करा

0
7

>> काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांचे आवाहन

>> मोदींच्या कार्यकाळात लोकशाहीला धोका

भारताची राज्यघटना, देशातील लोकशाही, विविधतेतील एकता हे टिकवून ठेवण्यासाठीची ही निवडणूक असून, त्यासाठी मतदारांना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला विजयी करावे लागेल, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यानी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना स्पष्ट केले.

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे देशातील लोकशाहीला कधी नव्हे एवढा धोका निर्माण झालेला आहे. भाजप आता देशात केवळ एकच पक्ष असावा असे मत व्यक्त करू लागला असल्याचे थरूर म्हणाले. त्याशिवाय सरकार विरोधकांवर ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांचा वापर करून त्यांच्यावर दबाब आणू लागले असल्याचा आरोप थरूर यांनी यावेळी केला.
गोवा हे धर्मनिरपेक्ष तत्वांचे पालन करणारे व विविधतेतील एकता जपणारे राज्य असून, गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेस पक्ष जिंकेल, असा विश्वास थरूर यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकार गोव्यावर लादू पाहणारे तीन वादग्रस्त केंद्रीय प्रकल्प, तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था, राज्यातील बेरोजगारी आदी विषयांमुळे गोमंतकीय केंद्रातील भाजप सरकारवर नाराज असल्याचे थरुर म्हणाले.
जनता मोदी यांच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायला आता तयार नसल्याचे थरुर म्हणाले. मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर देशभरातील युवक-युवतींसाठी दरवर्षी 2 कोटी रोजगाराचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. विदेशात असलेला काळा पैसा देशात परत आणून प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र, दिलेली सगळी आश्वासने ते विसरले आहेत. त्यामुळे आता मोदींच्या गॅरंटीवर लोक विश्वास ठेवणार नाहीत, असे थरूर म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तर केवळ खोटीच आश्वासने देत असल्याचे ते म्हणाले.

नुकत्याच झालेल्या दोन टप्प्यातील निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला अत्यंत कमी जागा मिळणार असून, त्यांनाही त्याची जाणीव असल्याचे थरूर म्हणाले. दक्षिण भारतातील राज्यांबरोबर, ईशान्य भारत, महाराष्ट्र एवढेच नव्हे तर उत्तर भारतातही यंदा भाजपला अत्यंत कमी जागा मिळतील, असे ते म्हणाले. भाजपचे पारंपारिक मतदारही भाजपला मते देण्यास निरुत्साही असल्याचे चित्र नुकत्याच झालेल्या दोन टप्प्यातील निवडणुकीत दिसून आलेले असून, उर्वरित टप्प्यांतही असेच चित्र दृष्टीस पडेल, असे थरुर म्हणाले.
भारतीय राज्य घटनेनुसार देशातील सर्व धर्मातील लोकांना समान हक्क आहेत. 1947 साली पाकिस्तानची स्थापना ही मुस्लिम राष्ट्र म्हणून झाली होती. मात्र, भारताची स्थापना ही धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून खूप विचारांती महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरु, बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद आदी लोकांनी केली होती याची थरुर यांनी यावेळी आठवण करून दिली.

मोदींच्या आताच्या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम मंत्री नसल्याचे सांगून देशाच्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासातील अशा प्रकारचे हे पहिलेच केंद्रीय मंत्रिमंडळ असल्याचे थरूर म्हणाले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, गोवा प्रदेश काँग्रेस नेते अमित पाटकर, उपाध्यक्ष सुनील कवठणकर व पक्षाचे सरचिटणीस विजय भिके हेही हजर होते.

दुहेरी नागरिकत्वाच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करताना थरूर हे म्हणाले की, आपण दुहेरी नागरिकत्वाच्या प्रश्नी व्यक्तिश: खूप प्रयत्न केले होते. मात्र, त्यावेळी आपणाला कुणाकडूनही आवश्यक तेवढा पाठिंबा मिळाला नसल्याचे ते म्हणाले. ही मागणी पूर्ण व्हायला हवी, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.