ताळगावात 68.79 टक्के मतदान

0
10

>> 14 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद

>> आज मतमोजणी

ताळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काल रविवारी सात प्रभागांत 68.79 टक्के मतदान झाले. या सात प्रभागांतील 14 उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांत सीलबंद झाले आहे. निवडणूक मतदानाच्या काळात मंत्री बाबूश मोन्सेरात, सिसील रॉड्रीग्स आणि इतरांमधील शाब्दिक चकमक वगळता मतदान शांततेत पार पडले. मतमोजणी आज सोमवार दि. 29 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता कांपाल पणजी येथील बालभवनाच्या सभागृहात करण्यात येणार आहे.

ताळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत कमी मतदानाची नोंद झाली आहे. या सात प्रभागांत सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला. ताळगाव पंचायत निवडणुकीसाठी सकाळच्या सत्रात चांगल्या मतदानाची नोंद झाली. मात्र संध्याकाळच्या सत्रात मतदानाला गती मिळाली नाही.

कामराभाट येथील मतदान केंद्राच्याजवळ बूथ उभारण्याच्या विषयावरून मंत्री मोन्सेरात आणि सीसिल रॉड्रीगीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. मतदान केंद्राच्या 100 मीटर क्षेत्रात उमेदवाराचा बूथ उभारण्यास मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी हरकत घेतली होती. तथापि, बाबूश मोन्सेरात यांच्या गटाच्या उमेदवारांनी 100 मीटरवर बूथ उभारल्याने सिसील रॉड्रगीस यांनी आक्षेप घेतला. विरोधी गटाकडून उमेदवाराचे नाव व चिन्ह असलेली मतदान स्लिप दिली जात असल्याने सिसील रॉड्रीगीस यांनी आक्षेप घेतला.
ताळगाव पंचायत निवडणुकीत मंत्री मोन्सेरात गटाच्या ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंटचे अकरा उमेदवार उतरले आहेत. त्यातील चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. तर, युनायटेड ताळगावकर या गटाने 10 प्रभागात उमेदवार उभे केले होते. त्यातील तीन जणांनी माघार घेतली. त्यामुळे बाबूश गटाचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले
आहेत.

ताळगाव ग्रामपंचायतीच्या एकूण 11 प्रभागांपैकी प्रभाग 1, प्रभाग 6, प्रभाग 10 आणि प्रभाग 11 या चार प्रभागात उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

11988 पैकी 8246 मतदारांनी केले मतदान

सात प्रभागातील 11988 मतदारांपैकी 8246 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष 3934 आणि महिला 4312 मतदारांचा समावेश आहे. सर्वाधिक मतदान प्रभाग 7 मध्ये 80.16 टक्के नोंद झाले. तर, सर्वांत कमी मतदान प्रभाग 3 मध्ये 56.85 टक्के एवढे झाले. प्रभाग 2 मध्ये 70.98 टक्के, प्रभाग 4 मध्ये 68.69 टक्के, प्रभाग 5 मध्ये 76.14 टक्के, प्रभाग 8 मध्ये 62.10 टक्के, प्रभाग 9 मध्ये 69.37 टक्के मतदान झाले.