लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज

0
19

>> 13 राज्यांतील लोकसभेच्या 88 जागांवर होणार मतदान; राहुल गांधी, ओम बिर्ला, अरुण गोविल, हेमामालिनी रिंगणात

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज (शुक्रवार दि. 26) होणार असून, या टप्प्यात 13 राज्यांतील 88 जागांवर मतदान होणार आहे. यापूर्वी या टप्प्यात 89 जागांवर मतदान होणार होते; मात्र मध्यप्रदेशातील बैतुल जागेवर बसपाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने आता या जागेवर 7 मे रोजी निवडणूक होणार आहे. या टप्प्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींपासून ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील प्रचार बुधवारी संपला होता. त्यानंतर आता शुक्रवारी दुसरा टप्पा पार पडणार असून, सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात केरळ (20), कर्नाटक (14), राजस्थान (13), महाराष्ट्र व उत्तर प्रदेश (प्रत्येकी 8), मध्य प्रदेश (6), आसाम व बिहार (प्रत्येकी 5), छत्तीसगड व पश्चिम बंगाल (प्रत्येकी 3) आणि जम्मू-काश्मीर, मणिपूर व त्रिपुरा (प्रत्येकी 1) मध्ये मतदान होणार आहे.
या टप्प्यात राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. या जागेवरून डाव्यांनी ॲना राजा यांना, तर भाजपने के. सुरेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भाजपच्या उमेदवारीवर कोटा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भाजपने रामायण मालिकेतील राम पात्र साकारणारे अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातील मेरठमधून उमेदवारी दिली आहे. मथुरेतून भाजपकडून अभिनेत्री हेमा मालिनी रिंगणात आहेत. बंगळुरू ग्रामीण मतदारसंघातून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे जावई सी. एन. मंजुनाथ हे रिंगणात आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे भाऊ डी. के. सुरेश त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. तिरुअनंतपुरमधून राजीव चंद्रशेखर, जोधपूरमधून गजेंद्र सिंह शेखावत आणि बारमेरमधून कैलास चौधरी हे केंद्रीय मंत्री रिंगणात आहेत.

एकूण 1198 उमेदवार रिंगणात

दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी शुक्रवारी एकूण 1,198 उमेदवार रिंगणात असतील. त्यामध्ये 1,097 पुरुष आणि 100 महिला उमेदवार आहेत. कर्नाटकात 14 जागांसाठी निवडणूक होणार आहे, त्यात सर्वाधिक 247 उमेदवार रिंगणात आहेत, त्यानंतर महाराष्ट्रात 8 जागांसाठी 204 उमेदवार आखाड्यात आहेत आणि केरळमधील सर्व 20 जागांसाठी 189 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.