>> अखेर सभेची तारीख निश्चित; भाजप प्रदेशाध्यक्षांची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गोव्यातील लोकसभा निवडणूक प्रचारसभेची तारीख अखेर निश्चित झाली असून, शनिवार दि. 27 एप्रिल रोजी पंतप्रधानांची दक्षिण गोव्यात सांकवाळ येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे. या सभेला जवळपास 50 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काल ही माहिती दिली.
सदानंद शेट तानावडे यांनी काल भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधानांच्या प्रचारदौऱ्याबाबत माहिती दिली.
सांकवाळ येथील नियोजित जाहीर प्रचारसभेची तयारी जोरात सुरू आहे. ही प्रचारसभा बिर्ला येथील मंदिराजवळील परिसरात घेतली जाणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले. यावेळी आमदार कृष्णा साळकर, संकल्प आमोणकर यांची उपस्थिती होती. भाजपच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील जाहीर प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. दोन्ही मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे राज्यातील लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघात कमळ फुलेल, असा विश्वास तानावडे यांनी व्यक्त केला.
विरियातो फर्नांडिस हे दुटप्पी
विरियातो फर्नांडिस हे दुटप्पी आहेत. त्यांनी गोमंतकीयांवर राज्यघटना लादण्यात आल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता ते त्या विषयावर चर्चा करण्याचे आव्हान देत आहेत. भाजपचा सामान्य कार्यकर्तासुद्धा त्यांच्याशी या विषयावर चर्चा करू शकतो. तथापि, अशा दुटप्पी माणसासोबत आम्हाला चर्चा करायची नाही, असेही तानावडे यांनी सांगितले.
एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न
विरियातो फर्नांडिस यांनी यापूर्वी देखील आक्षेपार्ह विधाने केली आहेत. फर्नांडिस यांनी राज्यघटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे. 15 ऑगस्ट रोजी वास्को येथील सेंट जसिंतो बेटावर भारताचा तिरंगा फडकवण्यास त्यांनी आक्षेप घेतला होता, असा आरोप तानावडे यांनी केला.
मुरगावात पंतप्रधानांच्या सभेची जनजागृती
मुरगाव मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दक्षिण गोव्यातील भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांचा काल प्रचार केला. सोबतच मुरगावातील जनतेला शनिवार दि. 27 एप्रिल रोजी सांकवाळ येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला येण्याचे निमंत्रण दिले. या परिसरातील नागरिकांना निमंत्रण पत्रिकाही वाटल्या. यावेळी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर उपस्थित होते. यावेळी शेकडो भाजप कार्यकर्त्यांसह प्रचारफेरी देखील काढण्यात आली.